भजनी बुवा कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध – पालकमंत्री नितेश राणेंची ग्वाही
कणकवली (प्रतिनिधी) : भजनी बुवा कलाकारांनी आपल्या कलेतून नेहमीच समाजप्रबोधन केले. भजनाच्या माध्यमातून अध्यात्मिक वारसा जोपासला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक भजनी बुवा कलाकार आहेत. भजनी कलाकारांच्या समस्या सोडविण्यासाठी सिंधुदुर्ग चा पालकमंत्री म्हणून नेहमीच प्राधान्य देईन. आमचे महायुती सरकार भजनी बुवांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. महाराष्ट्र भजनी बुवांचे भजन संमेलन मुंबई माटुंगा येथे भजनी बुवा भगवान लोकरे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार 19 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते. या भजन संमेलनात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मंत्री नितेश राणेंचा सत्कार राजर्षी शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष संतोष कानडे, भजनी बुवा प्रकाश पारकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बुवा प्रमोद हरयाण, बुवा रामदास कासले, बुवा मंगेश खाडये, बुवा संतोष मिराशी बुवा दुर्वास गुरव आदी उपस्थित होते.










