फोंडा – घाटमाथ्याची जीवनदायिनी “उगवाई नदी” गाळमुक्त आणि पुनर्भरणाच्या प्रतिक्षेत

पालकमंत्री नितेश राणे व जिल्हाधिकारी, तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून तातडीच्या कार्यवाहीची फोंडा करूळ, कणकवली येथे लगतच्या ग्रामस्थ – शेतकऱ्यांची आग्रही मागणी !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर, तातडीने घेतलेल्या आढावा बैठकीत, नाम. नितेश राणे यांनी, जिल्हाधिकारी यांना नद्या गाळमुक्त करण्याचे प्रस्ताव तसेच पोलीस अधीक्षकांना अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्यांसह लगतचे स्थानिक ग्रामस्थ – शेतकरी आणि उद्योजक यांचे मध्ये आनंद व्यक्त होत आहे. मात्र आलेल्या प्रस्तावावर तातडीने अंमलबजावणी व्हावी अशी आग्रही मागणी सर्वांकडून होत आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमध्ये कोल्हापूर सीमेवरील सह्याद्रीच्या पर्वतरांगामधून फोंडा – करूळ- जानवली-कणकवलीतून वाहणारी ” उगवाई” नदी त्यापैकी एक आहे. गेली कित्येक वर्षे गाळमुक्त आणि पुनर्भरणाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्या ,१५-२० वर्षात घाटाच्या रुंदीकरण, रस्ता नूतनीकरण, घळण भरणी, संरक्षण भिंती च्या नावाखाली जेसीबी – पोकलेन यांनी काढलेला डोंगराचा मलबा, यामध्ये झाडे – वेली,दगड- गोटे, माती , झुडुपे ठेकेदारांनी दुसऱ्या बाजूला खोल दर्यामध्ये टाकली आहेत.वस्तुता ती इतरत्र वाहून नेणे बंधनकारक असते. याबद्दल प्रत्येक पूर प्रसंगी निवेदनाद्वारे संबंधितांचे लक्ष वेधले गेले आहे. हा मलबा पावसाळ्यात खाली वाहत येऊन उगवाई नदीपात्रातून वाहत पुढे पुढे जातो. त्यामुळे दर्यांपासून, वाघोबा घळणी पासून ते कोंडीयेपर्यंत उगवाई नदी गाळाने तुडुंब भरल्याने, झुडपे वाढल्याने, नदीपात्र विस्तारत आहे. त्यामुळे पावसाळ्यात लगतच्या ग्रामस्थांच्या घरांना शेतकऱ्यांच्या शेतीला नुकसान पोहोचत आहे.

तरी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी उगवाई नदीची तातडीने पाहणी करून उगवाई नदी गाळमुक्त आणि पुनर्भरणासाठी प्रस्तावित करावी. दोन्ही किनाऱ्याच्या बाजूने संरक्षक भिंती व्हाव्यात.याची सत्वर प्रशासकीय पातळीवर कार्यवाही व्हावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थ शेतकरी यांनी केली आहे.याबाबतचे पत्र व मागणी ग्रामपंचायत फोंडाघाट यांचे कडूनही करण्यात आल्याचे समजते.

error: Content is protected !!