देवगडमधील प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी प्रशालेला आदर्श शाळा पुरस्कार

तळेरे (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किंजवडे ठाकूरवाडी या प्रशालेला भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. किंजवडे ठाकूरवाडी ही प्राथमिक शाळा पंचक्रोशीत उपक्रमशील शाळा म्हणून नावलौकिक आहे. या शाळेची स्थापना १४ एप्रिल १९४८ साली झालेली आहे. सध्या शाळेत चौथीपर्यंत वर्ग असलेल्या शाळेत १४ विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ही द्विशिक्षक कार्यरत असलेली ही शाळा सातत्याने विविध उपक्रमांमध्ये अग्रेसर असते. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात. शाळेचे मागील वर्षीच अमृत महोत्सव जल्लौषात संपन्न झाले. यामध्ये ग्रामस्थांनी व ग्रामपंचायतीने आर्थिक मदत देवून या शाळेचे कायापालट करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. शाळेचे नवीन रूप बोलक्या भिंती, प्रशस्त वर्गखोल्या, मुबलक पाणी, ई- लर्निंग, वाचनालय, शालेय व सहशालेय उपक्रम,पर्यावरणपूरक उपक्रम, माझी वसुंधरा अभियान, राष्ट्रसंत गाडगे बाबा स्वच्छता अभियान या सगळ्यांचा विचार करून शाळेला गुणांकन करण्यात आले. शाळेच्या सर्वांगीण विकासात विद्यार्थी, शिक्षक, पालक, ग्रामपंचायत, ग्रामविकास मंडळ हे पाचही स्तंभ झटत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकला पाहिजे व तो शाळेत टिकला पाहिजे या किंजवडे गावच्या सरपंचाच्या हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांना या शाळेत ज्ञानदान केले जाते. स्पर्धा युगात आपला विद्यार्थी टिकावा म्हणून शालेय व्यवस्थापन व ग्रामपंचायत सतत प्रयत्न करत असते. लोकसहभाग,शैक्षणिक उठाव, शैक्षणिक संधीची समानता, शैक्षणिक गुणवत्ता, शालेय व सहशालेय उपक्रम, शाळेची रंगरंगोटी व सजावट, शाळेसाठी ज्या शैक्षणिक गोष्टीची गरज आहे त्या सर्व गोष्टी लोकसहभागातून ग्रामस्थांनी मोठ्या मनाने देऊन केलेले सर्व डिजिटल वर्ग, उपलब्ध जागेत परसबाग, माझी वसुंधरा अभियान उपक्रमांतून ग्रामपंचायतीने केलेले बहुतेक कामे शाळेने गेल्या दोन वर्षात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती केली आहे. शिक्षकांचा समर्पण भाव, शाळेतील विद्यार्थ्यांचा मेहनतीपणा तसेच पालक व शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायतीचा सक्रिय सहभाग या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून शाळेने हा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. या गौरवाने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला असून शाळेतील शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. पुरस्कार वितरण समारंभ १९ जानेवारी २०२५ रविवार रोजी इच्छापूर्ती मंगल कार्यालय ओरोस येथील सभागृहात आयोजित करण्यात आला होता. किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रदीप परब,परबवाडी ऐक्यवर्धता मंडळाचे अध्यक्ष सुरेश परब,ठाकूरवाडी मंडळाचे अध्यक्ष महेश तळवडेकर, माजी ग्रा.पं.सदस्य जयदास परब, शाळेचे मुख्याध्यापक गोविंदराव जाधव, सहशिक्षक महेश इंगोले हे पुरस्कार स्विकारताना उपस्थित होते. व्यासपीठावर भा.ज.पा.जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, भा.ज.पा.सरचिटणीस तथा किंजवडे गावचे सरपंच संतोष किंजवडेकर, माजी पं.स.सदस्या सुप्रिया वालावलकर, माजी सभापती सुधीर नकाशे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती राज्य संघटक किसन दुखंडे, जिल्हाध्यक्ष संतोष पाताडे आदि उपस्थित होते. मुख्याध्यापकांनी हा पुरस्कार संपूर्ण शाळा परिवारांचे यश असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना पुढेही अशीच मेहनत घेऊन शाळेचा गौरव वाढविण्याचे आवाहन केले आहे. शाळेच्या या यशाबद्दल पालक माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहेत.

error: Content is protected !!