२०२२-२३ साठी अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे तर २०२३-२४ साठी १७ कोटी रुपयांचे मूळ बजेट जाहीर
भजनी मंडळी, मधुमेह रोगी आणि वणवे ग्रस्तांसाठी खास तरतूद
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे अंतिम सुधारित २४ कोटी रुपयांचे आणि २०२३-२४ या आर्थिक वर्षाचे १७ कोटी रुपयांचे मूळ बजेट आज प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी सादर केला. २०२२-२३ या आर्थिक वर्षाचे मूळ बजेट १२ कोटींचे होते. मात्र, त्यात १२ कोटींची दुप्पट वाढ झाली आहे. सादर करण्यात आलेल्या मूळ बजेटमध्ये भजनी मंडळांसाठी साहित्य पुरविण्याची, जिल्ह्यातील मधुमेह रुग्णांसाठी मधू संजीवनी योजना तर वणवे ग्रस्तांच्या नुकसानी रक्कमेत भरीव वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, १९९२ नंतर ३० वर्षांनी जिल्हा परिषदेचा बजेट प्रशासनाने सादर केला आहे.
जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात यासाठी प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या अध्यक्षतेखाली खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक उदय पाटील, सामान्य प्रशासन उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, ग्राम पंचायत उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी वल्लरी गावडे, प्रभारी अतिरिक्त मुख्य लेखा व वित्त अधिकारी विलास आरोंदेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ महेश खलीपे, महिला बाल कल्याण जिल्हा कार्यक्रम अधिकारी संतोष भोसले, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर, जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा कार्यकारी अभियंता महाजनी, शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांच्यासह लेखा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.