गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका- जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल

देवगड प्रतिनिधी : गावामध्ये कायदा सुव्यवस्था सुस्थितीमध्ये राखण्यासाठी पोलीसांबरोबर ग्रामस्थांची देखील महत्वाची भुमिका असते. गावातील लोकांचे पोलीसांना सहकार्य हेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याचे प्रमुख कारण आहे. वेळगिवे-वाघिवरे गाव हा शांतताप्रिय असल्याचे गौरउदगारही ग्रामसंवाद उपक्रम कार्यक्रमामध्ये सिंधुदूर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक सौरवकुमार अग्रवाल यांनी व्यक्त केले.

वेळगिवे रामेश्वर मंदिरामध्ये ग्रामसंवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव,विजयदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक मनोज सोनवलकर,पोलीस उपनिरिक्षक दशरथ चव्हाण, क्राईम् ब्रँचचे पोलीस निरिक्षक राजेंद्र पाटील,वेळगिवे-वाघिवरेचे सरपंच राजन लाड, उपसरपंच सहदेव लाड, जीवाजी लाड, विजय लाड, माजी सरपंच संतोष चव्हाण, माजी सरपंच सुप्रिया मांजरेकर, वेळगिवे पोलीस पाटील महेश लाड, वाघिवरे पोलीस पाटील श्रीराम नारकर आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले की, आम्ही जिल्हयामधील प्रत्येक गावामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अनेक उपक्रम राबवित आहोत. जनतेमध्ये प्रबोधन करण्याचे देखील काम आपल्या पोलीस दलातर्फे करण्यात येत आहेत. सायबर गुन्हयांची फसवणूक होवू नये म्हणून प्रत्येक व्यक्तींने मोबाईल वरती आपल्या बँक खात्याची माहिती कोनालाही फोनव्दारे देवू नये. अनेक निनावी कॉल बँकेतून बोलत असल्याचे सांगून आपल्याकडून ओटीपी घेवून आपली फसवणूक करतात यामुळे आपण सावधगिरी बाळगली पाहिजे. महिलांनी देखील आपल्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून सजग राहिले पाहिजे.

पोलीसखाते तुमचे सदैव संरक्षण देण्यासाठी तत्पर आहेत. प्रवास करतेवेळी महिलांना अनोळखी व्यक्तींकडून अडविले असल्यास 112 नंबरवरती कॉल केल्यावरती पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी काहि वेळातच येवून आपला बचाव करु शकतात. जनेतेचे प्रश्न निकाली काढण्यासाठी आम्ही 100 टक्के प्रयत्न करतो यासाठी जनतेचेही सहकार्य महत्वाचे असते आणि ते या जिल्हयामध्ये आपल्याला मिळत आहे. वेळगिवे-वाघिवरे गाव हा अतिशय दुर्गम भागामध्ये असून या गावामध्ये मात्र कोणताही अवैदय व्यवसाय नसून या गावातील लोक हे शांतता प्रिय व कायदा सुव्यवस्था जोपासणारे असल्यामुळे या गावामध्ये तंटे निर्माण होत नसल्याचे मला सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधिक्षक असल्याचा अभिमान आहे.

या गावामध्ये माकडांचा उच्छाद जास्त आहे हि या गावातील लोकांची समस्या दुर करण्यासाठी व वाघांचा देखील बंदोबस्त करण्यासाठी आपण वन विभागाशी चर्चा करुन हा देखील प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सरपंच राजन लाड, सुप्रिया मांजरेकर यांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार संतोष चव्हाण यांनी मानले.

error: Content is protected !!