एस.टी.बस चुकल्यास दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत रिक्षा सेवा

शिरगाव रिक्षा चालक – मालक संघाचा सामाजिक उपक्रम

शिरगाव (प्रतिनिधी) : दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर पोहोचण्यासाठी एस.टी. बस चुकल्यास, देवगड तालुक्यातील शिरगाव रिक्षा चालक-मालक संघाने सामाजिक बांधिलकीतून मोफत रिक्षा सेवा सुरू केली आहे. संघटनेने दरवर्षीप्रमाणे शिक्षणाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवार, २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दहावीच्या परीक्षांसाठी, शिरगाव परीक्षा केंद्राच्या कार्यक्षेत्रातील २० गावांतील सहा माध्यमिक शाळांचे एकूण २५५ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ठ झाले आहेत. या विद्यार्थ्यांना परिक्षा कालावधीत एस.टी. बस चुकल्यास, त्यांच्या गावापासून परीक्षा केंद्रापर्यंत मोफत रिक्षा सेवा पुरवली जाणार आहे. या उपक्रमाचा लाभघेण्यासाठी विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी रिक्षा संघटनेशी मोबाइलवरून संपर्क साधावा, असे संघटनेचे अध्यक्ष तारक चव्हाण (९९२१३८१८१२) आणि सचिव महेश ओंबळकर (९५२७७६५५०१) यांनी सांगितले आहे.

शिरगाव परीक्षा केंद्रात समाविष्ट असलेल्या आदर्श विद्यामंदिर (किंजवडे), महात्मा गांधी विद्यामंदिर (तळेबाजार), माध्यमिक विद्यामंदिर (साळशी), शिरगाव हायस्कूल (शिरगाव), माध्यमिक विद्यामंदिर (कुवळे) आणि माध्यमिक शिक्षण शाळा (कोळोशी हडपीड) – या शाळांमधील विद्यार्थ्यांना हा उपक्रम लाभदायक ठरणार आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाच्या दिशेने मोठे पाऊल ठरणार असून, परीक्षेच्या काळात त्यांना दिलासा मिळवून देईल.

error: Content is protected !!