कोल्हापूर (प्रतिनिधी) : महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी शहरासह जिल्ह्यातील सर्व महादेव मंदिरांत विविध धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. लक्षतीर्थ येथील प्रसिद्ध असलेल्या महाशिवरात्री यात्रेची ग्रामस्थांनी जय्यत तयारी केली आहे. तसेच महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई व फुलांनी महादेव मंदिरांची सजावट करण्यात आली आहे.यावेळी लहान मुलांसाठी पाळणे आणि खेळणी यांची गर्दी झाल्यामुळे लहान मुलांमध्ये उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले.
महाशिवरात्रीनिमित्त गेल्या आठवड्यापासून मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने जोरदार तयारी सुरू होती. बुधवारी महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने सर्व मंदिरांबाहेर दर्शनरांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. उन्हाचा तडाखा लक्षात घेऊन मंदिरासमोर मंडप घालण्यात आले आहेत. शहरातील ग्रामदैवत कपिलेश्वर, लक्षतीर्थ, ऋणमुक्तेश्वर, उत्तरेश्वर, अतिबलेश्वर, वटेश्वर, कैलासगडची स्वारी, पंचगंगा नदीघाटावरील तारकेश्वर, कुक्कुटेश्वर, फलगुलेश्वर यासह परिसरातील वडणगे, बहिरेवाडी, सातेरी, शिंगणापूर येथील महादेव मंदिरांत गुरुवारी महाप्रसादाचे आयोजन केले आहे. लक्षतीर्थ वसाहत येथे महाप्रसाद सकाळी 7 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत चालू होता. यावेळी भागातील नागरिकांना गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.












