प्रसिद्ध निवेदक निलेश पवार यांची वक्तृत्वावरील कार्यशाळा संपन्न
खारेपाटण (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कला क्रीडा व सांस्कृतिक चळवळीला एका वेगळ्या उंचीवर नेणारे प्रसिद्ध निवेदक, आवाजाचे जादूगार निलेश पवार यांची वक्तृत्व या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच खारेपाटण हायस्कूल येथे संपन्न झाली. सदर कार्यशाळेत प्रशालेतील सुमारे २५० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. शेठ न. म. विद्यालय खारेपाटण व ज्युनिअर कॉलेज खारेपाटणचे प्राचार्य संजय सानप यांनी निलेश पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. “आपण सगळेच बोलत असतो पण प्रभावी बोलता येण्यासाठी चांगल्या प्रशिक्षणाची गरज असते.म्हणून आपल्या प्रशालेमध्ये या कार्यशाळेचे आयोजन केले असल्याचे प्रशालेचे प्राचार्य संजय सानप यांनी प्रास्ताविक पर भाषणात बोलताना व्यक्त केले.
तर सदर कार्यशाळेत मार्गदर्शन करताना निलेश पवार म्हणाले,” परस्परांशी संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम भाषा जरी असले तरी त्या भाषेचा वापर करण्यासाठी आवाज महत्त्वाचा असतो तरच बोलणे प्रभावी होते. त्यासाठी अभ्यासाची प्रशिक्षणाची गरज असते. आवाजातील नको तो भाग काढून टाकला की दर्जेदार संवाद होतो. विद्यार्थ्यांनी वक्तृत्व कलेकडे भविष्यातील करिअर म्हणून पहावे असेही आवाहन यावेळी बोलताना निलेश पवार यांनी केले.” या कार्यशाळेत विद्यालयाचे पर्यवेक्षक संतोष राऊत, ज्येष्ठ शिक्षक दयानंद कोकाटे, महेंद्र चिंगळे, संगाप्पा गुरव, प्रा. रश्मी देसाई, महींद्रे मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोठे सर तर आभार प्रदर्शन रश्मी देसाई यांनी केले.















