पालकमंत्री नितेश राणेंची सुवर्णगड वर भेट घेत दिलीप तळेकर ,बंड्या नारकर यांच्याकडून विशेष आभार
तळेरे (प्रतिनिधी) : पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाच्या नकाशावर विशेष स्थान मिळवून देणाऱ्या बहुप्रतिक्षित फाईव्ह स्टार ताज हॉटेलचा मार्ग मोकळा केला. ताज हॉटेल निर्मितीसाठीचा अत्यंत महत्वाचा असलेला त्रिपक्षीय करार 18 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी तारांकित ताज हॉटेल निर्मितीचे पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी आपल्या आक्रमक विकासदृष्टीने अत्यावश्यक पावले उचलून हा त्रिपक्षीय करार घडवून आणला. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलवून टाकणाऱ्या ताज ग्रुपचे हॉटेल प्रत्यक्षात साकारण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांची कणकवली भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप तळेकर, पडेल मंडल तालुकाध्यक्ष बंड्या नारकर यांनी सुवर्णगड या शासकीय निवासस्थानी सदिच्छा भेट घेत विशेष आभार मानले. यावेळी देवगड पं स चे माजी सभापती रवी पाळेकर, फणसगाव ग्रा.पं सदस्य कृष्णकांत आडेलकर उपस्थित होते. येत्या 4 ते 5 वर्षांमध्ये शिरोडा वेळागर येथे 142 सूट असलेले आलिशान फाईव्ह स्टार ताज हॉटेल प्रत्यक्षात उभे राहण्याची अपेक्षा आहे. भविष्यात ताज हॉटेलमुळे उच्चभ्रू पर्यटकांची पावले आपोआप सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे वळतील. ताज मध्ये मुक्कामी येणारे पर्यटक जिल्ह्यातील अन्य स्थानिक पर्यटन स्थळांना भेटी देतील. देवगडसह कणकवली तालुक्यातील पर्यटन स्थळांकडेही ताज हॉटेलमध्ये मुक्कामी असलेले देशी,परदेशी हायप्रोफाईल पर्यटक आपली पावले वळवतील. साहजिकच याचा फायदा येथील स्थानिक सर्व्हिस इंडस्ट्रीमधील लहान मोठ्या उद्योजकांना होईल. यामुळे स्थानिक युवकांना रोजगाराची संधी मिळून आर्थिक समृद्धी येणार आहे. यासाठीच पालकमंत्री नितेश राणे यांची मुंबईत भेट घेऊन दिलीप तळेकर, बंड्या नारकर , रवी पाळेकर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी विशेष आभार मानले.












