फोंडाघाट (प्रतिनिधी) : नाथ पै ज्ञान प्रबोधिनी करूळ प्रशालेत NDRFच्या वतीने विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विविध आपत्तींच्या प्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय तसेच संकटसमयी प्रसंगावधान राखून स्वतःचा व इतरांचा बचाव कसा करावा, याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली.
यावेळी NDRF चे सब इन्स्पेक्टर शशी कुमार, हेड कॉन्स्टेबल विश्वनाथ शेलार, कॉन्स्टेबल नामदेव मोरे, कॉन्स्टेबल शरयू साळुंखे व कॉन्स्टेबल शुभम कदम यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध बाबी समजावून सांगितल्या. प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांद्वारे विद्यार्थ्यांना संकटाच्या परिस्थितीत योग्य निर्णय घेणे, सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे आणि बचावकार्यादरम्यान आवश्यक ती खबरदारी घेणे याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमास प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण नारकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्तीच्या प्रसंगी घाबरून न जाता प्रसंगावधान राखून संकटांवर मात करण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धेश खटावकर यांनी केले.












