सरकारी वकील रुपेश देसाईंचा यशस्वी युक्तिवाद
ओरोस (प्रतिनिधी) : अल्पवयीन गतिमंद आणि मतिमंद असलेल्या दिव्यांग पीडित युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गुन्ह्यातील आरोपी पांडुरंग बाळकृष्ण कदम ( वय 39 वर्षे, रा. नानेली, उत्कर्षनगर ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश – १ एस.टी. त्रिपाठी यांनी तिसऱ्यांदा फेटाळला. जामीन अर्ज सुनावणीवेळी सरकार पक्षाच्या वतीने सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. आरोपी पांडुरंग कदम याने पीडित युवतीच्या घरात घुसून तिला घराबाहेर ओढत आणून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. ही घटना २६ नोव्हेंबर २०२४रोजी घडली होती. पीडितेच्या नातेवाईकाच्या फिर्यादीनुसार आरोपी पांडुरंग कदम विरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात २७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सध्या न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी पांडुरंग बाळकृष्ण कदम याने जामिनावर मुक्तता होण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपीला जामीन मंजूर करण्यावर सरकारी वकील रुपेश देसाई यांनी हरकत घेतली. आरोपी पांडुरंग कदम याने पीडित युवती अल्पवयीन मतिमंद आणि गतिमंद असल्याचे माहीत असूनही हा गंभीर गुन्हा केला आहे, पीडित युवतीला याचा धक्का बसला असून ती अद्याप घराबाहेर जाण्यास घाबरत आहे, आरोपी पीडित युवती, फिर्यादी, साक्षीदार यांच्यावर दबाव आणून त्यांना न्यायालयात साक्ष देण्यापासून परावृत्त करू शकतो, आरोपी हा आडदांड वृत्तीचा असून घरात घुसून गुन्हा करू शकतो, न्यायालयिन खटल्यावेली आरोपी फरार होऊ शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायाधीश श्री. त्रिपाठी यांनी आरोपी पांडुरंग कदम याचा जामीन अर्ज तिसऱ्यांदा फेटाळून लावला.











