बांदा (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील इन्सुली परिसरातील कोठावळेबांध, माड भाकर व डोबवाडी भागात मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक व ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांना प्रत्यक्ष बोलावून रस्त्याची गंभीर समस्या निदर्शनास आणून दिली.
ग्रामस्थांच्या तक्रारीची तत्काळ दखल घेत नितीन राऊळ यांनी संबंधित हायवे विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इन्सुली येथील एन.एच ६६ वरील खड्डे तसेच गटाराची समस्या तातडीने सोडविण्याची मागणी केली. “काम तात्काळ सुरू केले नाही तर आम्हाला उपोषणाला बसावे लागेल,” असा इशाराही त्यांनी संबंधित विभागाला दिला.
जिल्हा परिषद सदस्य नितीन राऊळ यांच्या पाठपुराव्याची दखल घेत आज अखेर या ठिकाणी रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. त्यामुळे इन्सुली परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त होत असून, नितीन राऊळ यांच्या तत्परतेचे व पाठपुराव्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कामाला सुरुवात केल्याबद्दल हायवे विभागाचे अधिकारी श्री. यांचे नितीन राऊळ यांनी आभार मानले. तसेच, “रस्त्याचे काम केवळ तात्पुरते न करता चांगल्या दर्जाचे आणि टिकाऊ व्हावे,” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
ग्रामस्थांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रशासनाशी समन्वय साधून प्रभावी पाठपुरावा करावा, याचे हे उदाहरण असल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली.











