सावत्र अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधम गिरीगोसावी चा जामीन दुसऱ्यांदा नामंजूर

सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ; आरोपीच्या जेलमुक्कामात आणखी वाढ

ओरोस (प्रतिनिधी) : स्वतःच्या अल्पवयीन सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या सावत्र बाप असलेल्या नितीन केशव गिरीगोसावी ( वय वर्षे 55, सध्या रा. वेंगुर्ले कॅम्प, ख्यालगिरी, मूळ रा. पूसेगाव चिंचणी, ता.खटाव, जि. सातारा ) याचा जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीश – 1 टी. एस.त्रिपाठी यांनी दुसऱ्यांदा नाकारला. जामीन अर्ज सुनावणीवेळी जोरदार हरकत घेत सरकारी वकील रुपेश देसाई यांनी यशस्वी युक्तिवाद केला. स्वतःच्या सावत्र 12 वार्षिक अल्पवयीन मुलीवर नराधम नितीन गिरीगोसावी याने लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीची आई आजारी असून अंथरुणाला खिळून असते. पीडितेची आई आणि अल्पवयीन बहिणीसमोर नराधम गिरीगोसावी याने पीडिता विरोध करत असतानाही हा गुन्हा केला होता. मे 2022 ते 30 एप्रिल 2023 दरम्यान हा गुन्हा घडला होता. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी नितीन गिरीगोसावी विरोधात वेंगुर्ले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी नितीन गिरीगोसावी याने जामीन मिळण्याकरिता जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. जामीन अर्ज सुनावणीवेळी सरकारी वकील रुपेश देसाई यांनी पुढील मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून जामीन अर्ज मंजूर करण्याला हरकत घेतली. आरोपीला जामीन मिळाल्यास तो पीडित मुलीसोबत राहून पुन्हा तिच्यावर अत्याचार करू शकतो, आरोपी पीडितेच्या आई आणि अल्पवयीन बहिणीला गुन्हा दाखल झाल्याच्या रागातून त्रास देऊ शकतो, आरोपीला दारूचे व्यसन असून नशेत तो पीडिता आणि तिच्या आई बहिणीच्या जीवाचे बरेवाईट करू शकतो,पीडिता विरोध करत असतानाही आरोपी ने तिला मारहाण करत तिच्यावर बलात्कार केला असून आरोपीला जामीन मंजूर झाल्यास समाजात कायद्याविषयी चुकीचा संदेश जाऊ शकतो. सरकारी वकील रुपेश देसाई यांचा यशस्वी युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा न्यायालयाने आरोपी नितीन गिरीगोसावी याचा जामीन अर्ज दुसऱ्यांदा नाकारला असून त्याचा जेलमुक्काम आणखी वाढला आहे.

error: Content is protected !!