वैभववाडी (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्याचा फटका हातातोंडांशी आलेल्या आंबा, काजू पिकाला बसला आहे. वादळाने कोवळे काजू बी, आंबा गळून पडल्यामुळे झाडांखाली अक्षरशः कोवळ्या काजू बी, व आंब्यांचा खच्च पडल्याचे पाहायला मिळत आहे. आधीच गेले काही दिवस तीव्र उष्णतेमुळे काजू आंबा पीक करपून गेले आहे.नैसर्गिक संकटाने शेतकरी हतबल झाला आहे.
तालुक्यात गेले काही दिवस उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे. सरासरी ३८ ते ४० डिग्री तापमानाची नोंद होत आहे. या तीव्र उष्णतेने आंबा, काजुचा मोहर व कोवळी फळे करपून जात आहेत. या संकटात आणखी भर म्हणून गेले दोन दिवस सह्याद्री पट्ट्यातील गावांना जोरदार वादळाचा सामना करावा लागत आहे. या जोरदार वादळामुळे काजूची कोवळी बी, तसेच कोवळी कैरी मोहोर गळून पडला आहे.तालुक्यातील भुईबावडा आखवणे, मौदे, भोम, करूळ,कुंभवडे नावळे, सडूरे, आचिर्णे, खांबाळे सह अन्य गावांना या वादळाचा तडखा बसला आहे. अचानक आलेल्या या संकटामुळे शेतकरी हतबल झाला आहे. कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करीत आहेत.











