रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी कीर्ती किरण पुजार यांनी काम पाहिले आता त्यांची धाराशिव जिल्हाधिकारी पदी बढतीवर बदली झाल्याने त्यांच्या जागी वैदही मनोज रानडे यांची नियुक्ती शासनातर्फे करण्यात आली आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये निवासी जिल्हाधिकारी असताना २००५मध्ये महापुराची स्थिती निर्माण झाली होती. पूरपाहणीसाठी जिल्हाधिकारी खेडमध्ये तर अप्पर जिल्हाधिकारी चिपळूणमध्ये अडकून पडले होते. त्या प्रसंगी मुख्यालयाच्या ठिकाणी प्रशासकीय जबाबदारी स्वीकारून महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ वैदेही यांच्यावर आली. जिल्ह्यात पूरस्थिती असताना कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी सातत्याने विचारणा सुरू होती. तत्काळ पाणी सोडल्याने पूरस्थिती अधिक चिघळण्याची स्थिती असल्याने अत्यंत आव्हात्मक परिस्थितीमध्ये ‘पाणी सोडू नका’ असा थेट आदेश त्यांनी दिला. परंतु पाणी थांबवणे शक्य नसल्याचे पत्र आल्यानंतर त्यांनी हे पाणी टप्प्याटप्प्याने आणि विभागून सोडण्याचे निर्देश देऊन मोठे संकट दूर केले. आपत्कालीन परिस्थिती असल्याने भारतीय सैन्य दलाशी समन्वय साधण्यापासून ते नागरिकांना धीर देण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या रानडे यांनी हिमतीने पेलल्या.
उपजिल्हाधिकारी ते अप्पर जिल्हाधिकारी हा त्यांचा प्रवास रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर आणि ठाणे असा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये विस्तारला आणि बहरला आहे. आई माध्यमिक शिक्षिका आणि वडील हिवताप अधिकारी अशी कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या वैदेही यांना दोन बहिणी आहेत. तीन मुलींपैकी एकीने तरी प्रशासकीय सेवेत जावे ही आई-वडिलांची इच्छा होती. एमपीएससीच्या माध्यमातून त्यांची उपजिल्हाधिकारी म्हणून निवड झाली आणि त्यांच्या प्रशासकीय सेवेला सुरुवात झाली. प्रशासनामध्ये काम करताना अनेक आव्हानात्मक प्रसंग उद्भवले. अशा प्रसंगांना त्यांनी धीराने सामना केला.सिंधुदुर्गमध्ये असताना तेथील मुलींमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्यामुळे त्यांच्यासाठी तपासणी व मार्गदर्शन शिबिरे त्या भरवत असत. तसेच, पौगंडावस्थेतील मुलगे अधिकतर दुर्लक्षित राहत असल्यामुळे त्यांच्यासाठी मार्गदर्शन व संवादसत्रे त्या आयोजित करीत. हे उपक्रम सिंधुदुर्गमधील बहुतेक गावी पोहोचले होते. नंतर बदली झाल्यामुळे तेथील उपक्रमांत त्या योगदान देऊ शकल्या नाहीत. परंतु, भविष्यात त्यांना महिला व मुलांसाठी काम करायला नक्की आवडेल, असेही त्या आवर्जून सांगतात.
प्रथम प्रयत्नावेळी त्या एमपीएससी आणि युपीएससी या दोन्हींच्या प्रथम फेरीतच अनुत्तीर्ण झाल्या. पुन्हा एकदा अपयश येऊनसुद्धा त्यांनी जिद्दीने, नव्या जोमाने अभ्यासाला सुरुवात केली. यावेळी त्या फक्त एमपीएससीची परीक्षा देत होत्या. दीड वर्ष कौटुंबिक उत्सव आणि इतर प्रलोभनांपासून दूर राहून केवळ अभ्यासात स्वतःला झोकून देत त्यांनी परीक्षा दिली. त्या उपजिल्हाधिकारी झाल्या, हे त्यांना कळले, तेव्हा प्रथमतः त्यांचा यावर विश्वासच बसत नव्हता. त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.











