कोकण रेल्वेमार्गावर चिंचवली ते बेर्ले दरम्यान घडली घटना
खारेपाटण (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर धावत्या रेल्वे समोर रेल्वे ट्रॅकवर धावत जाणाऱ्या तरुणाला रेल्वेची धडक बसून तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात रेल्वेच्या धडकेत तरुणाच्या देहाचे तुकडे झाले असून योगेश रघुनाथ शिंगाळे ( वय 36) रा. केळवली, ता राजापूर, जि.रत्नागिरी असे मयत युवकाचे नाव आहे. आज सकाळी 8 ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान कोकण रेल्वे मार्गावर चिंचवली ते बेर्ले दरम्यान ही घटना घडली. दरम्यान मयत योगेश शिंगाळे हा वेडसर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या घटनेची खबर संदीप रमाकांत नलावडे ( वय 47 वर्षे, रा.मोसम, ता. राजापूर ) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली असून सी आर पी सी कलम 174 नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटनास्थळी महिला पोलीस उपनिरीक्षक वृषाली बर्गे यांनी पोलीस नाईक उद्धव साबळे, कॉन्स्टेबल पराग मोहिते, बारड यांच्यासह भेट देत प्राथमिक पाहणी करत पंचनामा केला. अधिक तपास पोलीस नाईक उद्धव साबळे करत आहेत.