विशेष संपादकीय
राजन चव्हाण (सिंधुदुर्ग) : ठाकरे शिवसेनेचे नेते अतुल रावराणे यांना 2024 च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदार संघात उमेदवारीची लॉटरी लागणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात असून तसे झाल्यास राणे कुटुंबियांना नेहमीच अंगावर घेणारे ठाकरे शिवसेनेचे डॅशिंग नेते अतुल रावराणे आणि भाजपाचे विद्यमान उमेदवार नितेश राणे यांच्यात आमदारकी साठीची थेट तुल्यबळ लढत होणार अशी चर्चा सध्या कणकवली विधानसभा मतदारसंघातील राजकीय वर्तुळात आहे. पक्ष कुठलाही असला तरी वैयक्तिक संबंध टिकवून ठेवणारा आणि कार्यकर्ता कुठल्याही पक्षाचा असो, अडचणीच्या प्रसंगाला पक्षभेद न पाहता अडचणीत कार्यकर्त्याच्या मदतीला पदरमोड करत उपयोगी पडणारा दिलदार नेता म्हणून कणकवली देवगड आणि वैभववाडी विधानसभा मतदारसंघात अतुल रावराणे यांची ओळख आहे. पक्षाने नुसते फक्त लढ म्हटले तरी स्वतःच्या मनगटाच्या जोरावर भिडण्याची तयारी असणारा नेता म्हणून अतुल रावराणे यांना सगळेच ओळखतात.राजकीय छक्केपंजे न करणारा, पोटात एक आणि ओठात दुसरे अशी कालिकांडी अतुल कधीच करत नाहीत हे सर्वांनाच माहिती आहे. मैत्रीसाठी काहीही करायला असणारा दिलदार माणूस असे अतुल रावराणेंचे व्यक्तिमत्त्व आहे. राज्यात महविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे शिवसेना- भाजपा सरकार सत्तेत येत सत्तांतर होण्याआधीपासूनच अतुल रावराणे हे अलीकडे काही महिने सक्रिय राजकारणापासून दूर असल्याचे दिसून येत होते.कारण नेतृत्वगुण असूनही पक्षाकडून ठोस जबाबदारी त्यांच्यावर सोपवली जात नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांतील राजकीय घडामोडी पाहता अतुल रावराणे पुन्हा ऍक्टिव्ह झाले असून राजकारणात सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यातच अतुल रावराणे यांनी देवगड तालुक्यात वणवा लागून नुकसान झालेल्या बागायतींची पाहणी करत शेतकरी बागायतदारांना धीर देऊन दिलासाही दिला. त्यानंतर आमदार नितेश राणे आणि शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्यात झालेली शाब्दिक टिक्काटिपणी अवघ्या जिल्ह्याने अनुभवली.अतुल रावराणे हे नेहमीच कोणतीही भीडभाड न ठेवता केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंसह, आमदार नितेश राणेंपर्यंत सर्व राणे कुटुंबियांना अंगावर घेताना दिसतात. एकीकडे राणे कुटुंबीय ठाकरे कुटुंबियांवर टीकेची एकही संधी सोडत नाहीत तर दुसरीकडे सिंधुदुर्गात मात्र शिवसेना नेते अतुल रावराणे नेहमीच राणे कुटुंबियांना टोकाच्या टिकेने लक्ष्य करत असतात. अतुल रावराणे मागील एक तपाहुन अधिक काळ कणकवली विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सक्रिय आहेत. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस मधून त्यांनी विधानसभा निवडणूकही लढवली . त्यानंतर भाजपा आणि आता उद्धव ठाकरेंसोबत शिवसेना नेते म्हणून कार्यरत आहेत. राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडत स्वतःचा स्वाभिमान पक्ष स्थापन केला आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्वाभिमान पक्ष भाजपात विसर्जित केला.त्या घडामोडीत राणेंचे कट्टर विरोधक असलेले अतुल रावराणे यांनी भाजपातून बाहेर पडत शिवसेनेत प्रवेश केला. नंतर झालेल्या घडामोडीत राणेंची साथ सोडून शिवसेनेत आलेल्या सतीश सावंत यांना नितेश राणेंविरोधात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली. सतीश सावंत यांना उमेदवारी जाहीर होण्याआधी 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून विधानसभेचे तिकीट मिळण्यासाठी अतुल रावराणे यांचे नाव आघाडीवर होते. 7 महिन्यांपूर्वी राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर सिंधुदुर्गातही राजकीय समीकरणे बदलली आहेत. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राणे कुटुंबियांची ताकद आणि शिंदे च्या ताब्यात गेलेल्या शिवसेनेची त्यांना असलेली साथ याविरोधात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केलेला इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार ठाकरे शिवसेनेकडून नितेश राणेंविरोधात उभा केला जाणार हे निश्चित आहे. याच निकषांवर सध्या अतुल रावराणे यांना 2024 च्या कणकवली विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने बांधणी करण्याचे संकेत मिळाल्याची चर्चा जोरदार सुरू आहे. तसे झाल्यास नेहमीच राज्याचे लक्ष लागून असलेल्या कणकवली विधानसभा मतदारसंघात एक हायव्होल्टेज तुल्यबळ लढत पाहायला मिळणार आहे.