कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या वतीने कणकवली तालुक्यातील हळवल गावचे सुपुत्र प्रभाकर विठोबा चव्हाण यांना संत रविदास समाज भूषण पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुजित जाधव यांच्या हस्ते पुरस्कारस्वरूप शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन प्रभाकर चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी जिल्हा सचिव चंद्रसेन पाताडे, खजिनदार नामदेव जाधव, विजय चव्हाण, ॲड. अनिल निरवडेकर, महेंद्र चव्हाण प्रकाश वाघेरकर, लवेंद्र किंजवडेकर, सुंदर जाधव, राजेंद्र चव्हाण, विठ्ठल चव्हाण आदी उपस्थित होते. प्रभाकर चव्हाण हे मागील २५ वर्षे चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. रिक्षा व्यावसायिक असलेले प्रभाकर यांची ग्रामीण भागात समाजसंघटन संवर्धन आणि समाजबांधवांवरील अन्यायाबाबत जाब विचारणारा आंबेडकरवादी विचारांचा हाडाचा कार्यकर्ता म्हणून ओळख आहे. चर्मकार समाजातील तरुणांना संघटित करून युवा संकल्प प्रतिष्ठान संस्था स्थापण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. हळवल ग्रामपंचायत माजी सदस्य, अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा सदस्य, युवा संकल्प प्रतिष्ठान चे विद्यमान मार्गदर्शक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांचा समाजाप्रती असलेल्या जिव्हाळा लक्षात घेत त्यांना संत रविदास समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.












