भविष्यात मधाचं गाव- फोंडाघाट खेळणी निर्मितीचं सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केंद्र बनाव -तन्वी मोदी

मोबाईल मध्ये व्यस्त असणाऱ्या आजच्या मुलांना, ही खेळणी बाहेर काढतील आणि त्यामुळे खेळणी इंटरनॅशनल ब्रँड ठरतील – चंद्रशेखर सिंग

भारत सरकारच्या गुरु – शिष्य हस्तशिल्प प्रशिक्षणाचा मान राज्यात फोंडाघाट ला ! गुरु मारुती मेस्त्री अन् ट्रेनर मानसिंग पोरते यांचे विशेष कौतुक !

हस्तशिल्प प्रशिक्षण कार्यक्रमाची यशस्वी सांगता !

फोंडाघाट (प्रतिनिधी) : देशात 33 ठिकाणी सुरू असलेल्या हस्तक्षिल्पकला प्रशिक्षण केंद्रापैकी, महाराष्ट्र राज्यात एकमेव, लाकडी खेळणी व हस्तक्षेप प्रशिक्षण केंद्राचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडाघाट गावाला मिळाला आहे.गेले दोन महिने सुरू असलेल्या या केंद्रावर लहानांपासून युवा प्रशिक्षणार्थीसह कौटुंबिक महिलांनी चांगला प्रतिसाद दिला. यातून सिंधुदुर्ग त्यातही फोंडाघाट ही कलाकारांची खाण असल्याचे सिद्ध झाले. या प्रशिक्षणातून परिसरातील कलाकार एकत्र आले. ज्याप्रमाणे कोल्हापुरी चप्पल, सावंतवाडीची खेळणी यांनी जीआय नामांकन मिळवले, तसेच वैशिष्ट्यपूर्ण नामांकन फोंडाघाटच्या हस्त- शिल्पाला मिळावे.कोरोना नंतर चायना ची खेळणी बंद झाली आणि त्यामुळे संधी निर्माण झाली. त्याचं सोनं करून मोबाईल मध्ये गुंग, मुला-मुलींना बाहेर काढून ही खेळणी आकर्षित करतील. व्यावसायिक दृष्ट्या ह्या ट्रेनिंगचा प्रशासकीय योजनांसाठी लाभ मिळण्यासाठी उपयोग होईल. त्यासाठी प्रशासनावर अवलंबून न राहता स्वतः सक्षम व्हावे. पाठपुरावा करावा. आमचा विभाग सदैव सहकार्य करील. असा विश्वास सीनियर असिस्टंट डायरेक्टर चंद्रशेखर सिंग यांनी व्यक्त केला.

सरपंच संजना आग्रे, तन्वी मोदी, मिलिंद लाड, स्नेहलता पांचाळ, हॅंडीक्राफ्ट प्रमोशन ऑफिसर आकाश मुळीक,प्राचार्य रणजीत मराठे, ट्रेनर मानसिंग पोरते, सुजाता हळदिवे- राणे,बबन हळदिवे, ज्ञानेश चिंदरकर, विश्वनाथ जाधव,कुमार नाडकर्णी, ग्रामसेवक मंगेश राणे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुसूत्रसंचालन भालचंद्र राणे यांनी केले. यावेळी संपूर्ण सभागृहातील, गेल्या दोन महिन्यात येथील कलाकारांनी निर्मिलेल्या सुबक लाकडी खेळणी, मोटर गाड्या, स्टॅच्यू, घरगुती वापरातील वस्तू, प्राणी, बाहुल्या यांचे प्रदर्शन लक्षवेधी आणि प्रत्येकाला अचिंबित करणारे होते. प्राचार्य रणजीत मराठे यांनी मारुती मेस्त्री व ट्रेनर मानसिंग यांचे कौतुक करताना, खेड्यातील परिसरात कलाकारांना योग्य मार्गदर्शन मिळाले, की देखणं स्वर्ग निर्मिती होऊ शकते असे सांगितले. केवळ प्रशासनावर अथवा दुसऱ्यावर अवलंबून न राहता, स्वतः सक्षम होण्यासाठी, आता प्रत्येकाने प्रयत्न करत, व्यावसायिक होऊन स्वतःची- गावाची -जिल्ह्याची ओळख निर्माण करा असे आवाहन केले.

याप्रसंगी तन्वी मोदी,कुमार नाडकर्णी, सुजाता हळदिवे, तसेच प्रशिक्षणार्थी अनुजा मेस्त्री, सुप्रिया मडवाल, अजय मेस्त्री यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, मधासाठी प्रसिद्ध आपलं फोंडाघाट गाव, खेळण्यासाठी नामांकित व्हावं. हे प्रशिक्षण केंद्र कायमस्वरूपी सुरू राहून त्यास ग्रामपंचायत- प्रशासनाने सहकार्य करावे. त्यातून प्रशासनाने उदासीनता झटकून महिलांच्या सुप्त गुणांना ऊर्जा द्यावी.संधी मानून नोकरीच्या पाठी न धावता, प्रत्येकाने स्वयंपूर्ण व्हावे.असे विचार आपल्या मनोगतातून व्यक्त केले.शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना मान्यवरांचे हस्ते प्रमाणपत्र – गुलाबपुष्प देऊन गौरविण्यात आले. मारुती मेस्त्रींनी आजचा आपला वाढदिवस, लक्षणीय कार्यक्रमाने लक्षात राहील असे समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!