खारेपाटण (प्रतिनिधी) : आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल ली मॅरियेट समूहाचे मुख्य संचालक प्रदीप शिंदे यांनी नुकतीच खारेपाटण हायस्कूलला सदिच्छा भेट दिली. व शाळेच्या एकूण व्यवस्थापन विषयी माहिती जाणून घेत समाधान व्यक्त केले. याप्रसंगी त्यांचे खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊ राणे, सचिव – महेश कोळसुलकर, विश्वस्त प्रशांत गुळेकर, विजय देसाई, उद्योजक मनोज गुळेकर यांसह शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण व ज्यूनियर कॉलेज खारेपाटण आणि प्लस टू व्यवसाय अभ्यासक्रमाचे प्राचार्य संजय सानप तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. संपूर्ण शालेय परिसर पाहून प्रदीप शिंदे हे भारावून गेले.
यावेळी त्यांना शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लोकरे यांनी ग्रामीण भागातील या शैक्षणिक संस्थेने आजवर अनेक चागले विद्यार्थी घडवले असून आज हे विद्यार्थी देश विदेशामध्ये आपल्या कर्तुत्वाची पताका अभिमानाने फडकावीत असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच संस्था करत असलेल्या विकास कामांबद्दल ही यावेळी प्राचार्य संजय सानप यांनी देखील प्रदीप शिंदे यांना माहिती दिली. या सदिच्छा भेटीसाठी संस्थेचे विश्वस्त प्रशांत गुळेकर यांनी विशेष प्रयत्न केले. ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी करत कार्याबद्दल अध्यक्ष प्रविण व सर्व विश्वस्थ मंडळाचे, प्रदीप शिंदे यांनी अभिनंदन केले व त्यांच्या हॉटेल समूहाच्या माध्यमातून भविष्यामध्ये संस्थेला मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी प्रदीप शिंदे यांनी उपस्थित संस्था चालक व शिक्षकांना दिले.












