भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल कालावधीत सामाजिक समता सप्ताह

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ८ ते १४ एप्रिल २०२५ या कालावधीत “भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आज येथील सामाजिक न्याय भवन येथे आपल्या हस्ते करण्यात आले असल्याची माहिती समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह कार्यक्रम ८ एप्रिल पासून राबविला जात आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आज समाज कल्याणाचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी सहाय्यक लेखाधिकारी उदय यादव, आनंद तरपे यांच्यासह विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी श्री चिकणे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह कार्यक्रम ८ एप्रिल पासून राबविला जात आहे. यामध्ये आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामाजिक समता सप्ताहचे उद्घाटन करण्यात आले आहे. या कालावधीत भारतीय संविधानाची उद्देशिका, प्रस्ताविका यांचे नियमित वाचन करणे व जनजागृती करणे, ९ एप्रिल रोजी जिल्ह्यातील महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृहे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारांबर आधारीत वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, लघुनाट्य स्पर्धा इत्यादीचे आयोजन, १० एप्रिल रोजी समतादूतामार्फत ग्रामीण व शहरी भागात पथनाट्य व लघुनाटिका याद्वारे विविध योजनाबाबत जनतेचे प्रबोधन करणे, मार्जिन मनी योजनेतंर्गत कार्यशाळा राबविणे, ११ एप्रिल, रोजी महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करणे व व्याख्याने, १२ एप्रिल रोजी संविधान जागर व संविधान जनजागृतीसाठी कार्यक्रम, १३ एप्रिल रोजी जेष्ठ नागरिकांचे जनजागृती शिबीर व नागरीकांचा मेळावा, जिल्ह्यातील आरोग्य अधिकाऱ्यांच्या सहकाऱ्याने सर्व महाविद्यालय, आश्रमशाळा, शासकीय वसतिगृह येथे रक्तदान शिबीर तसेच स्वाधार शिष्यवृत्ती मिनी ट्रॅक्टर लाभाथ्यांना प्रतिनिधिक वाटप, १४ एप्रिल रोजी सामाजिक न्याय विभागांतर्गतअधिनस्त शासकीय कार्यालये, महाविद्यालय, आश्रम शाळा, येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून जयंती साजरी करणे व इतर कार्यक्रम व्याख्याने, चर्चासत्रे व सामाजिक समता सप्ताहाचे समारोप करण्यात येणार आहे.

तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह कार्यक्रमाचा लाभ जिल्हयातील जास्तीत जास्त नागरीक, विद्यार्थी, शासकीय वसितगृहातील विद्यार्थी-विद्यार्थीनी, कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपक्रमात सहभाग घेवून लाभ घेण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त संतोष चिकणे यांनी केलेले आहे.

error: Content is protected !!