स्वप्निल बेळेकर, विनया बेळेकर पतिपत्नीविरोधात आणखी ६ जणांची ७८ लाखांची फसवणूक केल्याची तक्रार

एम पी आय डी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्याचे तपासी अधिकारी अनिल हाडळ यांचे आवाहन

सिंधुदुर्ग (राजन चव्हाण) : शेअर ट्रेडिंग मध्ये पैसे गुंतवून दरमहा ८ ते १० टक्के व्याजदराने परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणाऱ्या वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे खांबलवाडी येथील स्वप्निल शांताराम बेळेकर, विनया स्वप्निल बेळेकर या पतिपत्नी विरोधात कणकवली पोलिस ठाण्यात सर्वेश भिसे यांच्यानंतर आणखी ६ जणांनी एकूण ७८ लाख ५ हजार रुपयांची आर्थिक फसवणुकी ची तक्रार करत एम पी आय डी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. बेळेकर दांपत्याकडून आणखी कोणाची आर्थिक फसवणूक झाली असल्यास तक्रार दाखल करण्याचे आवाहन पीएसआय अनिल हाडळ यांनी केले आहे. आर्थिक फसवणूक झालेल्यांमध्ये संगीता अच्युतराव वणवे यांची ५१ लाख ५० हजार, अरुण राधाकृष्ण इंगळे यांची १ लाख, गौतम विठ्ठल कासले यांची ३ लाख,महानंदा देवू पवार यांची ६ लाख २० हजार, धोंडू विलास बिडये यांची ११ लाख ५५ हजार, सुरेखा पिराजी कांबळे यांची ५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे तक्रार अर्जात नमूद केले आहे.स्वप्निल आणि विनया या पतीपत्नीने आपल्याला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रार अर्जात नमूद केले असून स्वप्निल बेळेकर आणि त्याची पत्नी विनया बेळेकर विरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण कायदा कलम ३, ४ तसेच बी एन एस कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिस निरीक्षकांकडे केली आहे. या तक्रार अर्जाची प्रत माहितीसाठी डी वाय एस पी, पोलिस अधीक्षक तसेच पोलिस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र यांना पाठवली आहे. एम पी आय डी कायद्यानुसार जर एकापेक्षा अनेक व्यक्तींची आर्थिक फसवणूक केली असेल तर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल होतो. सर्वेश भिसे यांनी याआधी कणकवली पोलिस ठाण्यात आरोपी स्वप्निल बेळेकर व त्याची पत्नी विनया बेळेकर विरोधात १२ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात अटकेत असलेला आरोपी स्वप्निल याला सुनावलेल्या पोलिस कोठडीची मुदत ९ एप्रिल रोजी संपत असून त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. सर्वेश भिसे याची जशी आर्थिक फसवणूक केली त्याच पद्धतीने आपलीही आर्थिक फसवणूक केल्याचे वरील ६ तक्रारदारांनी कणकवली पोलिस निरीक्षकांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद केले आहे. त्यामुळे आता आरोपी स्वप्निल बेळेकर आणि विनया बेळेकर विरोधात याआधी दाखल असलेल्या गुन्ह्यात एम पी आय डी कायदा कलमाची वाढ तपासी अधिकाऱ्यांनी केल्यास आरोपी स्वप्निल याला वाढीव पोलिस कोठडी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

error: Content is protected !!