मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवाद संपन्न

कुडाळ (प्रतिनिधी) : उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे आणि एकात्मिक फलोद्यान विकास अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ व २० मार्च २०२५ रोजी दोन दिवसीय मसाला पिके उत्पादन तंत्रज्ञान व प्रक्रिया या विषयावरील राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे करण्यात आले होते.सदर परिसंवादामध्ये गोवा,सांगली,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील १२० शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला. सदर परिसंवादाचे उद्घाटन महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रफुल्ल माळी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी योजनाप्रमुख डॉ.महेश शेडगे, कृषी पर्यवेक्षक श्री.यशवंत गव्हाणे, प्रगतशील शेतकरी श्री. गाडगीळ उपस्थित होते. डॉ.महेश शेडगे यांनी या परिसंवादाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. प्रगतशील शेतकरी श्री. गाडगीळ यांनी देखील मसाला पिकांची लागवड भविष्यात वाढली पाहिजे असे नमूद केले. अध्यक्षीय मार्गदर्शनात डॉ. प्रफुल्ल माळी यांनी मसाला पिकांच्या सद्यस्थिती व भविष्यातील लागवडीस असलेला वाव याविषयी आपले विचार मांडले. दोन दिवसाच्या परिसंवादामध्ये महाविद्यालयातील विविध प्राध्यापकांनी जायफळ, दालचिनी, काळी मिरी,आले,कोकम लागवड, त्यांचे व्यवस्थापन, कीड रोग नियंत्रण,प्रक्रिया आणि विक्री व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. काही प्रात्यक्षिके व प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. समारोप कार्यक्रमात उपस्थित शेतकऱ्यांना सहभागी प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी शेतकऱ्यांनी या स्तुत्य कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ.संदीप गुरव यांनी तर आभार प्रदर्शन डॉ.महेश शेडगे यांनी केले.सदर परिसंवादाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ.प्रफुल्ल माळी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक,अधिकारी, कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी व मजूर वर्गाचे मोलाचे सहकार्य लाभले.

error: Content is protected !!