विद्यामंदिर हायस्कूल मध्ये जादूटोणाविरोधी कार्यशाळा संपन्न
कणकवली (प्रतिनिधी) : समाजातील अशिक्षित आणि सुशिक्षित लोक कळत नकळत अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकलेले आहेत .त्यांना बाहेर काढण्यासाठी आपण जो समाजकार्याचा वसा घेतला आहे तो वाखाणण्याजोगा आहे.यावेळी समाजाकडून अपमानास्पद वागणूक ही मिळते. पण स्वतःच्या मनावर ताबा, संयम ठेवून जादूटोणा विरोधी कायद्याच्या सूक्ष्म अभ्यास करा.परिपूर्ण अभ्यास करून सक्षमपणे वाड्यावस्थातील लोकांचे प्रबोधन करण्यासाठी उतरा . पण अर्धवट ज्ञान हे नेहमी आपल्याला घातक ठरेल.यासाठी जादूटोणा विरोधी कायद्यातील बाराही कलमे सुक्षपणे समजून घ्या.समाजाला या अंधश्रद्धेच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी जी काही मदत माझ्याकडून व माझ्या शाळेकडून लागेल ती मी कधीही करायला तयार आहे. असे प्रतिपादन विद्यामंदिर कणकवलीचे प्राचार्य पी जे कांबळे सर यांनी केले.
जादूटोणा विरोधी कायदा प्रचार आणि प्रसार कार्यक्रम अंमलबजावणी समिती PIMC सिंधुदुर्ग आणि अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवशीय जादूटोणाविरोधी कायद्याची प्रात्यक्षिकासह कार्यशाळा विद्यामंदिर कणकवली येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत प्रमुख मान्यवर म्हणून ते बोलत होते.त्यांच्यासोबत विचारमंचावर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा संघटक विजय चौकेकर,जिल्हा उपाध्यक्ष अजितजी कांबळी,जिल्हा सचिव अजित कानशिडे, कणकवली तालुकाप्रमुख संपर्कप्रमुख सिद्धार्थ तांबे,कणकवली तालुका अध्यक्ष भगवान तांबे, जिल्हा सहसंघटिका उज्वला येळावीकर, जिल्हा युवा संघटक युगांत चव्हाण , जिल्हा सदस्य अनिल कदम,खजिनदार जयराम डांबरे आधी उपस्थित होते .
या कार्यशाळेत जादूटोणाविरोधी कायद्याची संपूर्ण माहिती प्रशिक्षणार्थींना विजय चौकेकर यांनी करून दिली . या कायद्यामध्ये देव आणि धर्म यांना कोणताही विरोध नसून समाजातील सामान्य नागरिकांची अज्ञानापोटी होणारी फसवणूक,लुबाडणूक,पिळवणूक,अपमान,भीती,धमकी, छळ,जीवाला धोका आणि नरबळी इत्यादी कृतींना आळा घालणे आणि भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य 51 ज क नुसार नागरिकांमध्ये विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन,मानवतावाद आणि शोधक बुद्धी व सुधारणावादी यांचा विकास करणे यासाठी कायदा करण्यात आला आहे . सर्वसामान्य लोकांचे शोषण करणाऱ्या भोंदू बाबा आणि जादूटोणा करणाऱ्यांना वचक बसावा यासाठी हा कायदा आहे .हा कायदा देव आणि धर्माविरुद्ध नसल्याचा जिल्हा संघटक विजय चौकेकर यांनी आपल्या दिवसभराच्या व्याख्यानात प्रशिक्षणार्थींना पटवून दिले.तसेच बाराही कलमांची सखोल माहिती देऊन त्या कलमांतर्गत घडलेल्या विविध घटनांची माहिती दिली. या कलमांतर्गत येणाऱ्या विविध प्रात्यक्षिकांचे माहिती देऊन प्रशिक्षणार्थींकडून विविध प्रात्यक्षिक करून घेतली. अजित पिंगुळकर, स्नेहा महाडिक ,शिवेंद्रकुमार महाडिक,यशवंत भोसले, विजय जाधव इ सुजाण नागरिकांनी हा कायदा दिवसभर उपस्थित राहून समजून घेतला. या कार्य शाळेचे प्रास्ताविक सिद्धार्थ तांबे यांनी केले तर आभार प्रदर्शन अजित कानशिडे सर यांनी केले .











