प्रसंगी कायदेशीर मार्गांचा अवलंब करणार ; मनसे जिल्हा सचिव सचिन तावडे यांचा मध्यम पाटबंधारे अभियंत्याना इशारा
वैभववाडी (प्रतिनिधी) : अरुणा मध्यम पाटबंधारे प्रकल्प बंदिस्त नलिका कालव्यासाठी ज्याप्रमाणे शेतकऱ्यांकडून क्षतिपुर्ती बंधपत्र लिहून घेत आहात. त्याप्रमाणे शासन म्हणून आपण देखील शेतकऱ्यांना हमीपत्र लिहून द्यावे.ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत त्यांना या योजनेचा कोणता लाभ होणार आहे याची सविस्तर माहिती हमी पत्रात द्यावी. जोपर्यंत याबाबत लेखी उत्तर मिळत नाही, तोपर्यंत मोबदला स्वीकारणार नाही. प्रसंगी कायदेशीर मार्गांचा अवलंब केला जाईल असा इशारा मनसे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सचिन तावडे यांनी कार्यकारी अभियंता मध्यम पाटबंधारे प्रकल्प कुडाळ यांना दिला आहे.
अरुण मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचे काम सध्या एडगांव गावात सुरू आहे. यासाठी शेतकऱ्यांकडून क्षतिपूर्ती बंध पत्र करण्यात येत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनाच वकिलाची फी द्यावी लागत आहे. मुळात या पत्रातील शब्दप्रयोग पूर्णतः शेतकरी विरोधी आहेत असे दिसते. त्यामध्ये काही विषयांची स्पष्टता दिसत नाही. शेतकऱ्यांच्या मिळकतीपैकी तिच्या कोणत्या दिशेकडील व किती क्षेत्र संपादित केले आहे. याबाबत सदर दस्तव्यामध्ये उल्लेख असणे आवश्यक आहे. संपादित क्षेत्रावरील किती जंगली झाडे, किती फळझाडे तसेच या झाडांचे मूल्यांकन कसे केले व मूल्यांकनाची रक्कम किती याचा उल्लेख असणे आवश्यक आहे. मुळात हे बंधपत्र हे फक्त शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीवरील झाडांच्या झालेल्या नुकसानी भरपाई बद्दलचे आहे.पण त्यात आपण कालव्याच्या कामाबाबत अन्य कोणत्याही प्रकारे हरकत अथवा अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास क्षतीपूर्ती बंधपत्र लिहून देणार यांनी जबाबदारी घ्यावी असा उल्लेख आहे तसेच हरकत घेतल्यास सदर हरकत दूर होऊन बांधकाम पुन्हा सुरू होईपर्यंतच्या दरम्यान झालेली नुकसान भरपाई लिहून देणारा यांनी द्यावी असाही उल्लेख या बंद पत्रात करण्यात आला आहे. बंदिस्त नलिका टाकून झाल्यावर लगेच शेतकऱ्यांच्या जमिनींचे रेखांकन करून त्यांची हद्द निश्चित करून देणे. सदरील कामांमध्ये उत्खरणाचे मोठे दगड माती काढण्यात आले आहे ती त्या ठिकाणावर तात्काळ उचलून सदरील जागा पुरवत करून देणे
बंदिस्त नलिकेवरून काढण्यात येणारी उपनलिका कोणत्या जमिनीतील किंवा सर्वे नंबर जाणार याची स्पष्टता त्या हमी पत्रात करण्यात यावी. काही शेतकऱ्यांचे बांध गडगे, कुंपण काढण्यात आले ते पूर्ववत बांधून द्यावेत
वरील योजनेमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होत आहेत.त्यांना या योजनेचा काय लाभ होणार याची सविस्तर माहिती या हमीपत्र देण्यात यावी. जेणेकरून शेतकरी निश्चित होतील व त्यांची गळचेपी होणार नाही. जोपर्यंत आपण याबाबत लेखी उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही शेतकरी मोबदला स्वीकारणार नाहीत.असा इशारा देत प्रसंगी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा या पत्राद्वारे तावडे यांनी दिला आहे.












