ग्रामस्थ व विद्यार्थ्यांची गैरसोय
वैभववाडी (प्रतिनिधी) : हेत शेवरी फाटा ते मौदे दरम्यान रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम चालू असल्यामुळे या मार्गावरील एसटी वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे भोम आखवणे, मौदे या गावातील प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. सध्या शाळा महाविद्यालयांच्या वार्षिक परीक्षा चालू असून एसटी बंदचा फटका या विद्यार्थ्यांना बसत आहे. तरी एस टी वाहतूक सुरु करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हेत ते मौदे दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली होती. गेल्या काही दिवसापासून रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या नूतनीकरणाच्या कामामुळे एसटी वाहतूक बंद करण्यात आले आहे मात्र इतर वाहतूक या मार्गावर सुरू आहे. मग एसटी वाहतूकच बंद का करण्यात आली आहे असा सवाल ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. या रस्त्यावर येणारे भोम आखवणे, मौदे या गावातील प्रवाशांची तसेच शालेय विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे. सध्या शाळा महाविद्यालयाच्या वार्षिक परीक्षेचा कालावधी सुरू असून एसटी बस सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना हेत शेवरी फाट्या पर्यंत पायपीट करावी लागत आहे.यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच गावातील वयोवृद्ध व आजारी रुग्ण याची गैरसोय होत आहे. त्यामुळे एका बाजूला काम चालू ठेऊन एका बाजूने एस. टी बस सुरु ठेवावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत वाहतूक नियंत्रक वैभववाडी यांच्याशी संपर्क साधला असता, रस्त्यावर खड्डी पसरून ठेवली आहे. तसेच रस्ता अरुंद व अवघड वळणाचा असल्यामुळे एस टी. वाहतूकीस अडचण येत आहे. अशा परिस्थिती एखादा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण राहणार त्यामुळे एस टी वाहतूक बंद असल्याचे सांगितले.












