तळेरे (प्रतिनिधी) : साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाच्या वतीने वार्षिक सत्यनारायण पूजेनिमित्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ढोल ताशा वादन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 12 मे रोजी सायंकाळी 7.30 वाजता साळीस्ते गुरववाडी चव्हाटा येथे होणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी साळीस्ते गुरववाडी ग्रामस्थ मंडळाने गुरववाडी चव्हाटा येथे श्री सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी 1 ते 3 वा. महाप्रसाद, सायंकाळी 4 ते 6 वा. पर्यंत सुस्वर भजने होतील. त्यानंतर सायंकाळी 7.30 वा. श्री. खांबेश्वर सेवा मित्र मंडळ साळीस्ते गुरववाडी यांच्यावतीने आयोजित केलेल्या ढोल ताशा वादन स्पर्धेचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
या स्पर्धेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संघ सहभागी होऊ शकतात. त्यासाठी 25 एप्रिल पूर्वी नोंदणी करणे आवश्यक आहे. या स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख रुपये 8 हजार, व्दितीय विजेत्या संघाला रोख रू. 6 हजार, तृतीय विजेत्या संघाला 5 हजार आणि उत्तेजनार्थ संघाला 2 हजार पाचशे आणि प्रत्येकी सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येईल. तसेच, उत्कृष्ट ढोल वादक, उत्कृष्ट ताशा वादक, उत्कृष्ट झांज वादक, उत्कृष्ट ध्वज नाचवणे यांना प्रत्येकी ५०१/– आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धा संपल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेत सहभागासाठी प्रवेश फी रू. 500 असून स्पर्धेत सहभागासाठी तेजस गुरव, साळीस्ते गुरववाडी 7066674129, बाळा नारकर – 70217 60475, सुशिल गुरव – 9763164686 यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.