शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करुन प्रश्न साेडवण्याचे दिले आश्वासन
सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील स्थानिक डीएड बेरोजगारांचा प्रश्न सुटावा व न्याय मिळावा. यासाठी शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तुमचे मुद्दे त्याना पटऊन देऊ असे आश्वासन सामाजिक कार्यकर्त्या कमल ताई परूळेकर यांनी आज उपोषणास बसलेल्या डी एड उमेदवारांना दिला.
जिल्ह्यातील स्थानिक डी.एड. बेरोजगार संघर्ष समितीच्या वतीने २७ मार्च पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरु आहे.या उपोषण स्थळी आज सामाजिक कार्यकर्त्या कमलताई परूळेकर यांनी भेट दिली . उपोषण करणाऱ्या डी एड उमेदवारांच्या समस्या जाणुन घेतल्या. यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डी एड महिला -पुरुष उमेदवार या ठिकाणी उपोषणास बसले असतांना त्याना भेट देणे, त्यांच्या समस्या जाणुन घेणे, ही जिल्ह्याचे पालकमंत्री व शिक्षण मंत्री याची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याकडून याकडे पूर्णपणे दुलक्ष झालेला आहे. मग जिल्ह्यातील नागरिक आणि बेरोजगरानी न्याय कोणाकडे मागावा?असा प्रश्र सामाजिक कार्यकर्त्या कमल ताई परुळेकर यांनी उपस्थित केला आहे.
शिक्षण मंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये रिक्त शिक्षक पदी नियुक्ती मिळावी यासाठी आमरण उपोषण चालू असताना शिक्षण मंत्र्यांनी त्याची साधी दखल घेऊ नये हे खरोखरच दुर्दैव म्हणावे लागेल. मात्र जिल्ह्यातील बेरोजगार डी एड उमेदवारांना न्याय मिळावा यासाठी आपण शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची भेट घेऊन त्यांच्या पर्यंत डी एड उमेदवारांचा आवाज पोहोचविण्याचे प्रयत्न करु. अशी ग्वाही देत या आंदोलनाला पाठिंबा दिला.