ज्ञानदेव मेस्त्री व मित्रपरिवार यांच्यामार्फत संगणक व शैक्षणिक साहित्य प्रदान
चौके (प्रतिनिधी) : प्राथमिक शाळा धामापूर खालचावाडा या शाळेला धामापूर गावातील शिक्षणप्रेमी रहिवाशी ज्ञानदेव मेस्त्री व मित्रपरिवार यांच्या सोमवार १२ मे रोजी मार्फत मोफत संगणक व शैक्षणिक साहित्य देणगी स्वरूपात देण्यात आले. यावेळी सदर संगणक साहित्याचे उदघाट्न धामापूर सरपंच मानसी परब यांच्या हस्ते करण्यात आले.
दरम्यान या कार्यक्रमाला धामापूर सरपंच मानसी महेश परब, उपसरपंच रमेश निवतकर, पोलीस पाटील वैभव धामापूरकर, सामाजिक कार्यकर्ते महेश परब, शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष गुरुप्रसाद परब शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मानसी गावडे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य संजय गावडे, सत्यवान थवी, वेदिका आंगणे, ममता गावडे व विद्यार्थी आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेला संगणक व विविध शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणारे ज्ञानदेव मुरलीधर मेस्त्री यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सरपंच मानसी परब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ज्ञानदेव मेस्त्री यांच्या पत्नी यांचाही शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष मानसी गावडे यांच्या हस्ते शाल व श्रीफळ, गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.
शाळेला संगणक व विविध शैक्षणिक व खेळाचे साहित्य दिल्याबद्दल शाळेच्या मुलांनी, ज्ञानदेव मेस्त्री व मित्रपरिवार यांचे आभार मानले. उपसरपंच रमेश निवतकर, ग्रामस्थ तळवडेकर यांनीही आपल्या मनोगतातून ज्ञानदेव मेस्त्री यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या. शाळेचे मुख्याध्यापक गणेश पाताडे यांनी संगणक व विविध शैक्षणिक साहित्य मिळवून देण्यासाठी ज्ञानदेव मेस्त्री यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिली व शाळा आणि गाव यांच्याशी असलेले मेस्त्री परिवार यांचे नाते अतूट आहे हे उपस्थितांना सांगितले.तसेच शाळेला संगणक व इतर साहित्य दिल्याबद्दल धन्यवाद दिले.
तसेच संगणक दाते व सत्कारमूर्ती ज्ञानदेव मेस्त्री यांनी आपल्या मनोगतातून संगणक व इतर शैक्षणिक साहित्य घेण्याकरिता लागणारा निधी गोळा करताना आपला मित्रपरिवार यांची मोलाची साथ मिळाल्याचे सांगूनशाळेबद्दलचे आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळा धामापूर खालचा वाडा शाळेच्या उपशिक्षिका लीना उदय गोसावी यांनी केले तर उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक गणेश पाताडे यांनी मानले.
















