वैभववाडी आपत्ती व्यवस्थापन समिती सभा संपन्न
वैभववाडी (प्रतिनिधी) : पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी सर्व विभागामध्ये समन्वय आवश्यक आहे. आपत्तीच्या काळात सामूहिकरित्या प्रयत्न केल्यास आपत्तीच्या काळात वेळेत मदत करून पुढे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. यासाठी सर्व विभागाने पावसाळ्यात सतर्क राहावे.अशा सूचना तहसीलदार सूर्यकांत पाटील यांनी खातेप्रमुखांना दिल्या.
वैभववाडी तालुका नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा गुरुवारी पंचायत समिती सभागृहात तहसिलदार सूर्यकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अवसरमोल, गटविकास अधिकारी रामचंद्र जंगले, तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख गटशिक्षण अधिकारी मुकुंद शिंनगरे , सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, उपस्थित होते. गावातील अंतर्गत रस्ते झाड पडून किंवा अन्य कारणाने बंद झाल्यास संबंधित ग्रामपंचायत, पोलीस पाटील यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने वाहतुक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करावेत. रस्त्याकडेची धोकादायक झाडे तोडून घ्यावी.
करूळ व भुईबावडा हे दोन घाटमार्ग आहेत.पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका विचारात घेऊन आवश्यक ती उपाययोजना करावी.पडणे, वीज पडणे, झाडे पडणे हे धोके आहेत. आपत्ती काळात संपर्क साधण्यासाठी ऑकी -टॉकी पुरविण्यात आल्या आहेत. त्याचा वापर करण्यात येणार आहे.तसेच सोनाळी 6 नापणे 3 कुटुंबीयांना नदीच्या पुराच्या पाण्याचा धोका आहे. त्यांनास्थलातरीत होण्याचे आवाहन करण्यात आले असल्याचे तहसिलदार श्री पाटील यांनी सांगितले.
आपत्ती काळात कोणी वरिष्ठ नाही, कोणी कनिष्ठ नाही सर्वांनी सोबत राहून जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे पाटील यांनी सांगितले.
पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे नागरिकांना रेशन मिळण्यात अडचण येऊ नये यासाठी जून महिण्यात पुढच्या तीन महिन्याचे रेशन नागरिकांना एकाच वेळी देण्यात येणार असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढणे गरजेचे आहे. अन्यथा अतिवृष्टीत कोणत्याही प्रकारेचे नुकसान झाले नाही. तर त्यांना फार्मर आयडी शिवाय नुकसान भरपाई मिळणार नसल्याचे तहसीलदार पाटील यांनी यावेळी सांगितले.












