धनगरवाडी, शिरसाटवाडीतील ग्रामस्थांची गैरसोय
अन्यथा ग्रामपंचायत ला टाळे ठोकण्याचा उत्तम लोकेंचा इशारा
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील दारिस्ते गावातील मुख्य रस्त्यावर झाड तोडून टाकून गावातील शेकडो ग्रामस्थांचा वाहतुकीचा रस्ता विघ्नसंतोषी लोकांनी बंद केला आहे. तात्काळ रस्त्यावरील झाड बाजूला करून ग्रामस्थांची गैरसोय ग्रामपंचायत ने दूर केली नाही तर ग्रामपंचायत ला टाळे ठोकण्याचा इशारा दारिस्ते गावचे ग्रामस्थ तथा युवासेना तालुकाध्यक्ष उत्तम लोके यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिला आहे. प्रसिद्धीपत्रकात उत्तम लोके यांनी म्हटले आहे की, दारिस्ते मार्गे कळसुली जाणाऱ्या दारिस्ते गावातील मुख्य रस्त्यात विघ्नसंतोषी लोकांनी झाड तोडून रस्ता बंद केला आहे. रस्त्यावर टाकलेल्या झाडा च्या पूढे धनगरवाडी आणि शिरसाटवाडी आहे. या दोन्ही वाड्यांतील सुमारे 30 घरांतील ग्रामस्थांचा वाहतुकीचा रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मागील तीन दिवस मोठी गैरसोय निर्माण झाली असून याकडे स्थानिक प्रशासन म्हणून दारिस्ते ग्रामपंचायत ने दुर्लक्ष केले आहे. तात्काळ हे झाड हटवून रस्ता वाहतुकीस खुला केला नाही तर प्रसंगी ग्रामपंचायत ला टाळे ठोकणार असा इशाराच युवासेना तालुकाप्रमुख उत्तम लोके यांनी दिला आहे.












