तळेरे येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची ३०० वी जयंती साजरी – एका आदर्श महिला नेतृत्वाला वंदन….!

कर्तृत्ववान महिला व विद्यार्थीनींचा सन्मान…

तळेरे (प्रतिनिधी) : भारतीय इतिहासात मोठी युद्धे झाली, साम्राज्ये उभी राहिली आणि कोसळली. परंतु, या साऱ्या घडामोडींमध्ये ज्या व्यक्तींनी आपल्या कार्याने समाजहित, धर्मरक्षण आणि जनकल्याण या मूल्यांना सर्वोच्च मान दिला, त्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्थान अग्रभागी आहे. त्यांच्या जीवनकार्याने सिद्ध केलं की एका स्त्रीचं नेतृत्व केवळ राजसिंहासनापुरतं मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचू शकतं. अहिल्याबाई होळकर या केवळ इंदूरच्या होळकर घराण्याच्या महाराणी नव्हत्या तर त्या एक द्रष्ट्या प्रशासक, न्यायप्रिय नेत्या, धर्मपरायण समाजसुधारक आणि स्त्री सक्षमीकरणाच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे स्मरण व त्यांच्या विचारांमधून नव्याने प्रेरणा घेण्याचे निमित्ताने ३०० वी जयंती तळेरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात साजरी करून एका आदर्श महिला नेतृत्वाला मानवंदना देण्यात आली. त्यानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिला,आशा सेविका तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेमध्ये विशेष प्राविण्यसह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनी यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्प प्रदान करून सत्कार करण्यात आला. तसेच गुणवंत विद्यार्थिनींना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

सदरील कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.सदर कार्यक्रमास कणकवली पंचायत समितीचे माजी सभापती तथा भारतीय जनता पक्ष कणकवली ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. दिलीप तळेकर, सरपंच हनुमंत तळेकर, उपसरपंच सौ. रिया चव्हाण, माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शैलेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य संदीप घाडी, तंटामुक्ती अध्यक्ष निलेश सोरप, सामाजिक कार्यकर्ते तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा भारतीय जनता पक्ष कणकवली ग्रामीण मंडळ उपाध्यक्ष राजेश जाधव, भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा कणकवली तालुका उपाध्यक्ष कु.चिन्मय तळेकर, ग्रामपंचायत अधिकारी राजलक्ष्मी जाधव, वैद्यकीय अधिकारी धनश्री जाधव, आरोग्य सेवक श्री. मांडवकर, पोलीस पाटील चंद्रकांत जाधव यांचे सह अंगणवाडी सेविका, आशा सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
दिलीप तळेकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजलक्ष्मी जाधव यांनी केले.

error: Content is protected !!