कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरूच असून कणकवली शहरातील कनकनगर येथे घरफोडी करून चोरांनी साडेसहा तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र आणि चांदी लंपास केली आहे. शहरातील कनकनगर येथील समृद्धी कोरगावकर यांचे बंद घर चोरट्यानी फोडून सुमारे ३ लाख ५० हजार ५०९ रुपयांच्या मुद्देमाल चोरून नेला. समृद्धी मिलिंद कोरगावकर (32) या रविवारी सकाळी कामावरून आल्या त्यावेळी ही घटना उघडकीस आली. त्यानंतर या घटनेची खबर त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात दिली आहे त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समृद्धी कोरगावकर या शिरगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात परिचारिका म्हणून काम करतात असून शनिवारी 7 जून रोजी त्यांची रात्रपाळी असल्याने त्या सायंकाळी 6:25 वाजण्याच्या सुमारास घर बंद करून कामाला गेल्या. रविवारी 8 जून रोजी सकाळी 8:45 वाजण्याच्या सुमारास समृद्धी कोरगावकर या घरी आल्या त्यावेळी त्यांना घराच्या दरवाज्याचा कडी कोयंडा कटावणीसारख्या कोणत्यातरी हत्याराने उचकटलेला दिसला. त्यानंतर समृद्धी कोरगावकर यांनी घरात जाऊन पाहिले असता घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून ठेवलेले होते तसेच कपाटही विस्कटलेले होते. यावेळी त्यांच्या घरातील 65 ग्रॅमचे मंगळसूत्र 13 ग्रॅमची चैन चांदीचे साखळी तसेच देव्हाऱ्यातील चांदीच्या गणपतीची मूर्ती असा मुद्देमाल चोरट्याने चोरून नेला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ करत आहेत.
कणकवलीत घरफोडी ; साडेतीन लाखांचे दागिने चोरले
