ऐतिहासिक वारसा लाभलेल्या फोंडाघाट- माळवाडी, हवेलीनगर प्रशाळेत स्वागत उत्सवाची धूम —
फोंडाघाट (प्रतिनिधी ) : शाळेच्या पहिल्या दिवशी, फोंडाघाट- माळवाडी, हवेलीनगरची जि. प.प्राथमिक शाळा मुलांच्या स्वागतोत्सवासाठी रांगोळ्यांनी सजली होती. शाळेच्या वेळी सर्व मुलांची माथी, कागदी मुकुटांनी सजली होती. आमची शाळा– सुंदर शाळा,मी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेणार– अशा घोषणांनी, प्रभात फेरीने आसमंत दुमदुमला. शाळेत प्रवेश करताच,यावर्षी प्रथमच प्रवेश घेतलेल्या मुला- मुलींचे शाळेतील पहिले पाऊल, यशस्वी होण्यासाठी, कुमकुम जलातून कागदावर उमटविण्यात आले. आणि ते पाल्यांना आठवण भेट म्हणून देण्यात आले.शाळेतील प्रवेशोत्सवा दरम्यान मुला- मुलींचे औक्षण करण्यात आले. आणि उपस्थित मान्यवरांचे- पालकांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी तपासणीसाठी आलेले विशेष शिक्षक, नितेश तेली यांनी प्रशालेतील नियोजनाची प्रशंसा करताना मुलांचे स्वागत केले. मुलांच्या आदर्श भविष्यासाठी शाळेतील शिक्षक नेहमीच सर्वंकष प्रयत्न करतात.मात्र पालक आणि पाल्यांनी सुद्धा विशेष सजग राहून स्पर्धात्मक वाटचालीस सामोरे गेले पाहिजे. यावेळी शि.पा.संघाचे अध्यक्ष उमेश वंजारे यांनी शाळा आणि शिक्षक वर्गाचे कौतुक करून, शिक्षण – शिस्तही संस्काराचा खरा पाया सक्षम करणारी जि.प.ची प्राथमिक शाळा, नेहमीच आदर्शवत आहे. असा विश्वास व्यक्त केला. यावेळी मान्यवरांचे हस्ते मुलांना गणवेश, शूज, सॉक्स, आणि मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. वंजारे यांनी पावसाळा असल्याने शाळेला पायपुसणी भेट दिली. यावेळी मुख्याध्यापक माधवी जोशी, शितल बागवे, भाग्यश्री पाताडे, प्राची उरणकर,मयुरी मेस्त्री, सुलभा लाड,इत्यादी शिक्षक, कर्मचारी ,अंगणवाडी स्टाफ सह पालकांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती. शेवटी मुख्याध्यापक माधवी जोशी यांनी आभार मानले…











