कासार्डे विद्यालयातील ५० विद्यार्थ्यांना अडीच लाखांच्या शिष्यवृत्तीचे वितरण

लीलाविश फौंऊडेशनचा स्तुत्य उपक्रम

तळेरे (प्रतिनिधी) : लीलाविश फाऊंडेशनच्या वतीने कासार्डे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी २.५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वितरण प्रतिवर्ष करण्यात येते.
यावर्षीचा शिष्यवृत्ती धनादेश वितरण सोहळा संस्थेचे पदाधिकारी, लीलाविशेचे प्रतिनिधी तसेच प्राचार्य, पर्यवेक्षक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

याप्रसंगी व्यासपीठावर कासार्डे विकास मंडळ, मुंबईच्या स्थानिक व्यवस्था समितीचे माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर, स्थानिक व्यवस्था समितीचे विद्यमान कार्याध्यक्ष संजय पाताडे, स्कूल कमिटी चेअरमन अरविंद कुडतरकर, प्राचार्य एम.डी खाड्ये, लीलाविश फाउंडेशनचे प्रतिनिधी बबन नारकर,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

लीलाविश फाउंडेशनचे संचालक महेश विश्राम नारकर व राजेश विश्राम नारकर यांनी ग्रामीण भागातील गरीब, होतकरू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा भागवण्यासाठी प्रतिवर्ष शिष्यवृत्तीच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.
या उपक्रमासाठी ‘नारकर बंधुनी’ कासार्डे माध्यमिक विद्यालयाची निवड केली असून,गेल्या ४ वर्षापासून हा स्तुत्य उपक्रम सुरू आहे.

लीलाविश फाऊंडेशनच्या माध्यमातून कासार्डे विद्यालयात शिक्षण घेत असलेल्या इ.५वी ते इ.१२वी वर्गा मधील गरीब, होतकरू 50 विद्यार्थ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे २.५ लाख रुपये शिष्यवृत्तीचे वाटप याही वर्षी मान्यवरांच्या हस्ते धनादेश वितरण करुन झाले.या कार्यक्रमाला पालकही उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीचा वापर शैक्षणिक कार्यासाठीच करावा तसेच शैक्षणिक गुणवत्तेत वाढ करून इतरही गुण कला,आत्मसात करण्यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन नुतन कार्याध्यक्ष संजय पाताडे यांनी याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात माजी कार्याध्यक्ष प्रभाकर कुडतरकर म्हणाले की, लीलाविश फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले नारकर बंधूंचे हे शैक्षणिक कार्य निश्चितच कौतुकास्पद असून शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांनी आपली शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

आतापर्यंत ९ लाख ५ हजार रुपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप

चार वर्षांत कासार्डे माध्यमिक विद्यालयातील १८१ विद्यार्थ्यांना लीलाविश फाऊंडेशनच्या माध्यमातून ९ लाख ५ हजार इतक्या रक्कमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप झाले आहे, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य एम.डी. खाड्ये यांनी याप्रसंगी दिली व लीलाविश फाऊंडेशनच्या या उपक्रमाबद्दल नारकर बंधुना विशेष धन्यवाद देत त्यांचे आभार मानले.

दरम्यान लीलाविश फौंडेशनचे प्रतिनिधी बबन नारकर,पर्यवेक्षक एन.सी. कुचेकर आदींनी मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले.या कार्यक्रमाला विद्यालयाच्या जेष्ठ शिक्षिका सौ.बी.बी.बिसुरे व विद्यालयाचे क्रीडा शिक्षक दत्तात्रय मारकड हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.आर.व्ही राऊळ यांनी तर आभार एन.सी.कुचेकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!