रेकी करून चोरांनी मध्यरात्री केली चोरी
सायरन वाजताच लोडेड रिव्हॉल्वर कटावणी टाकून पसार
कणकवली (प्रतिनिधी) : जानवली कृष्णनगरी येथील श्री स्वयंभू दत्त मंदिरातील दत्ताची धातूची मूर्ती अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सायरन वाजल्याने चोरट्यांनी गावठी पाच काडतूस भरलेले रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळी सोडून पळून गेले. त्या आवाजाने मंदिराच्या शेजारी राहणारे ओंकार मोहिते यांना जाग आली. मात्र त्यांच्या घराच्या दरवाज्यांना चोरांनी बाहेरून कडी लाऊन ठेवली होती. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री १२.४५ वा. च्या सुमारास घडली. ओंकार मधुकर मोहिते यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पोलिसांसह कणकवली पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठसे तज्ञांकडून देखील घटनास्थळावरील ठसे घेण्यात आले आहेत. श्वान पथकाने देखील घटनास्थळी काही ठिकाणी भेट देत तपास केला. दरम्यान घटनास्थळी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह एलसीबी पोलीस उपनिरीक्षक आर. बी. शेळके, पोलीस हवालदार पांडुरंग पांढरे, विनोद चव्हाण, श्री. कळंत्रे यांच्यासह अन्य पोलीस अधिकारी कर्मचारी दाखल झाले.
शुक्रवारी मध्यरात्रीनंतर १२:४५ वा. च्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. दरम्यान स्वयंभू दत्त मंदिराचा दरवाजाचा कडी कोयंडा तोडून चोरट्याने मंदिराच्या गाभाऱ्यातील मूर्ती लंपास केली. मूर्ती लंपास करत असताना या ठिकाणी चोरट्यांकडे असलेले गावठी पाच काडतूस भरलेले रिव्हॉल्वर व कटावणी घटनास्थळीच टाकून सीसीटीव्ही चा सायरन वाजल्याने चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्यासह स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
कणकवली तालुक्यातील जानवली येथे मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या कृष्णनगरी येथे या स्वयंभू दत्त मंदिरची २०१९ मध्ये उभारणी करण्यात आली आहे. या ठिकाणी असलेले मोहिते यांच्या खाजगी मालकीचे हे मंदिर असून मोहिते यांना घरातील एका खोलीमध्ये जमिनीत ही मूर्ती मिळाल्याचा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी या मूर्तीची प्रतिष्ठापना करून या ठिकाणी स्वयंभू दत्त मंदिराची उभारणी केली. दरम्यान याबाबत ओंकार मोहिते यांनी कणकवली पोलिसात तक्रार दिली असून, त्यानुसार संशयीतांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी या मंदिराजवळ चौघे तरुण आले होते. यातील एकाने मोहिते यांना मला ओळखलं काय ? असं विचारून या मंदिरात असलेल्या दत्त मूर्तीचे दर्शन देखील घेतले होते. तसेच या ठिकाणचे व्हिडिओ शूटिंग करत फोटोही घेतले होते. त्यानंतर त्यांनी सदरची असलेली मूर्ती सोन्याची आहे का ? अशी विचारणा केली असता मोहिते यांनी होय असे सांगितले. अशी माहिती श्री. जाधव यांनी दिली. शनिवारी घडलेल्या घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही तपासणी केले असता त्यामध्ये संशयित तिघेजण व ३ तारीख ला आलेल्या तरुणांशी साधर्म्य असलेले आढळत असल्याचेही पोलीस निरीक्षक आतील जाधव यांनी सांगितले. शनिवारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास घटना घडली. त्यावेळी कटावणीच्या साहाय्याने चोरट्याने गाभाऱ्याच्या दरवाजाला लावलेले कुलूप तोडून ही मूर्ती पळवली. मात्र याच दरम्यान सीसीटीव्ही ला कनेक्ट असलेला सायरन वाजल्याने मोहिते कुटुंबीयांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी मोहिते यांच्या घराच्या मागील व पुढील दरवाजाला बाहेरून लॉक केले होते. त्यानंतर काही वेळातच चोरटे तेथून पळाले. चोरट्याने गाडी महामार्गालगत अलीकडे उभी करून ठेवली होती. मात्र अधिक माहिती मिळू शकली नाही.पोलिसांकडून या घटनेच्या पार्श्वभूमीवर तपासासाठी पथके नेमली आहेत. दरम्यान चोरी करणारे चोरटे देखील येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे दिसत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली पोलीस पथके करत आहेत.











