फोंडाघाटमध्ये रस्त्यातील खड्डयांनी घेतला वृद्धेचा जीव

पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधणार – अजित नाडकर्णी

फोंडाघाट (प्रतिनिधी) : फोंडाघाट मधील देवगड निपाणी राज्यमार्गाच्या रस्त्यावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून या खड्ड्यात मोटरसायकल जाऊन पडलेल्या शोभा गोसावी यांचे वैद्यकीय उपचारा दरम्यान निधन झाले आहे. या बाबत पालकमंत्री नितेश राणेंचे लक्ष वेधून तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांकडून खड्डेमय रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी ग्रामपंचायत सदस्य अजित नाडकर्णी यांनी सांगितले. फोंडाघाट मध्ये देवगड निपाणी राज्यमार्गावर हवेलीनगर पासून फोंडाघाट बाजारपेठ आणि फोंडाघाट च्या पायथ्यापर्यंत खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाळ्यात खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा अंदाज वाहनचालकांना येत नाही आणि त्यामुळे अपघात होत आहेत. दोन दिवसांपूर्वी सेवानिवृत्त एसटी वाहतूक नियंत्रक गोसावी हे आपल्या मोटारसायकलवरून पत्नी शोभा गोसावी हिच्यासह प्रवास करत होते. याच खड्ड्यांमध्ये गोसावी यांची मोटारसायकल जाऊन मागे बसलेली त्यांची पत्नी शोभा गोसावी या रस्त्यावर पडल्या आणि त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांच्यावर कणकवली येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र आज उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या जीवितहानी ला रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्याकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी जबाबदार असून याकडे पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधून तात्काळ खड्डेमय रस्त्याची डागडुजी करण्याची मागणीही करणार असल्याचे अजित नाडकर्णी म्हणाले.

error: Content is protected !!