आचरा (प्रतिनिधी) : कर्नाटक बेळगावचे चिरे वाहतूक करणारे १६ चाकी डंपरचे चालक रस्त्यालगत गाडी लावून हाँटेल तसेच विश्रांतीसाठी अनेक वेळा बसलेले आढळतात. काही वेळा गाडीचे काम आल्यास पळसंब शाळा नं १ च्या वरील बाजूस थाबवल्या जातात सदर ठिकाणी रस्ता वळणदार असल्याने ५ पेक्षा जास्त गाड्या एका लाईनमध्ये थांबल्याने अपघात होऊन शाळेतील मुलांच्या जिवीताला धोका उत्पन्न होऊ शकतो.
यापूर्वी एक वेळ अशी घटना घडली होती सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने धोका टळला होता. या विरोधात पळसंब ग्रामस्थांनी बुधवार ९ जुलै रोजी आक्रमक रुप धारण केले. याची खबर मिळताच त्रिंबक/ पळसंब पोलिस पाटील सिताराम सकपाळ घटना स्थळी दाखल होत आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांच्याशी संपर्क केला. आचरा पोलिस निरीक्षक प्रदीप पोवार यांनी बिट अंमलदार घाडीगांवकर यांना पाठवून सरपंच महेश वरक यांच्या मध्यस्थीने सामंजस्याने तात्पुरता तोडगा काढून विषय मिटवण्यात आला.
यावेळी पोलिस पाटील सिताराम सकपाळ, पोलिस पाटील गोलतकर, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष सावंत, शाळा मुख्याध्यापक कदम, नारायण सावंत, रविकांत सावंत, कपिल मुणगेकर, राजाराम गोलतकर, निनाद सावंत, दशरथ सावंत विद्यार्थी आदी उपस्थित होते. प्रशासनाने या प्रकाराकडे गंभीर लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थां मधून होत आहे. अशी माहिती पोलिस पाटील सिताराम सकपाळ यांनी दिली आहे.










