उबाठाचे युवक सेलचे तालुकाप्रमुख गणेश गावकर व उबाठाच्या कार्यकर्त्यांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींवर गुन्हा; अपर पोलीस अधीक्षक नयोमि साटम यांच्याकडे तपास
देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील मुणगे येथे एका तरुणाला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पाच जणांसह ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियमासह भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांनुसार देवगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी रोहित नारायण कदम (वय २२, रा. कसाल बौद्धवाडी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यांनी फिर्याद दिली असून, दि. ५ जुलै रोजी पहाटे १.३९ वाजता हा गुन्हा नोंदविण्यात आला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, अणुऊर्जा प्रकल्पाची जागा निश्चित नसल्याची वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीचा बॅनर मुणगे येथे लावण्यात आला होता. हा बॅनर पडल्याने फिर्यादी तो पुन्हा टेम्पोमध्ये भरत असताना आरोपी मनोज सावंत यांनी त्यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांनी इतर आरोपींना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतल्याचा आरोप फिर्यादीने केला आहे. त्यानंतर सर्व आरोपींनी एकत्र येत फिर्यादीला हाताने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याचवेळी फिर्यादी अनुसूचित जातीतील असल्याचे माहिती असूनही त्यांच्याविरुद्ध जातीवाचक अपशब्द वापरून सार्वजनिकरीत्या अपमान केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी मनोज सावंत, प्रमोद वळंजु, राहुल वळंजु, छोटू (प्रमोद)सावंत, उबाठाचे युवक सेलचे देवगड तालुकाप्रमुख गणेश गावकर तसेच उबाठाच्या कार्यकर्त्यांसह अन्य ८ ते १० अनोळखी व्यक्तींविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ मधील कलम ३(१)(r), ३(१)(s), ३(२)(va) तसेच भारतीय न्याय संहितेतील कलम ११५(२), १८९(२), १९०, ३२४(२), ३५१(२)(३) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास अपर पोलीस अधीक्षक नयोमि साटम करीत आहेत.











