कु .रेवण अनंत राऊळ राष्ट्रीय गुणवत्ता यादीमध्ये दहावा
खारेपाटण (प्रतिनिधी) : पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा – २०२६ मध्ये खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालय खारेपाटण या हायस्कूलने पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची उज्ज्वल परंपरा कायम राखत उल्लेखनीय यश संपादन केले असून, प्रशालेतील तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती मिळवत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. या शिष्यवृत्ती परीक्षेत कु. रेवन अनंत रावळ याने राष्ट्रीय गुणवत्ता यादीमध्ये दहावा क्रमांक पटकावत संस्थेचे, शिक्षकांचे आणि पालकांचे नाव अभिमानाने उंचावले. तसेच कु. अभिनव लक्ष्मीकांत हरयाण आणि कु. रितेश गोरक्षनाथ गायकवाड या दोन विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.तर विद्यार्थ्यांच्या या यशामुळे खारेपाटण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, शाळेच्या सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शैक्षणिक वाटचालीची ही आणखी एक गौरवास्पद नोंद ठरली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे सक्षम मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य लाभल्यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासाठी खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी खारेपाटण हायस्कूलला भेट देऊन विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व शुभेच्छा देत सत्कार केला. यावेळी खारेपाटण पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लोकरे, सचिव महेश कोळसुलकर, मुख्याध्यापक संजय सानप, पर्यवेशक संतोष राऊत, संस्थेचे विश्वस्त गुरुप्रसाद शिंदे, खारेपाटण सरपंच महेंद्र गुरव, खारेपाटण तालुका निर्मिती कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत राऊत, उपाध्यक्ष मंगेश गुरव, सचिव संतोष पाटणकर, संकेत शेट्ये, रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष दयानंद कोकाटे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. भविष्यातही अशाच प्रकारे उत्कृष्ट यश संपादन करून खारेपाटण हायस्कूलचे नाव राज्य व राष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करण्याचे आवाहन त्यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना केले.











