जलसमाधी आंदोलन प्रकरणी राजू शेट्टींसह महाविकास आघाडीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल

देवगड (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात लागू असलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून मिठमुंबरी येथील समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आयोजित केल्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या विविध पक्षांच्या नेत्यांसह बागायतदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर देवगड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणात खासदार राजू उर्फ देवाप्पा अण्णाप्पा शेट्टी, माजी खासदार (उबाठा) विनायक राऊत, राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारे, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, संघटनेचे अध्यक्ष आनंद ढोके, गणेश गावकर (युवा तालुकाप्रमुख, ठाकरे गट), गणेश वाळके, रामानंद वाळके, स्वप्निल तोडणकर, अजय नानेरकर, संजय आचरेकर, दिनेश धूवाळी, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, तालुकाध्यक्ष उमेश कुलकर्णी, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, प्रसाद दुखंडे, शरद परब, माजी आमदार वैभव नाईक, शिवसेनेचे तालुकाप्रमुख विलास साळस्कर, उबाठा गटाचे तालुकाप्रमुख रवींद्र जोगल, मनसे तालुकाध्यक्ष चंदन मेस्त्री, धीरज घाडी, मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब, डॉ. मंगेश सावंत आणि राजेंद्र गड्याळवर यांच्यासह अन्य संबंधितांचा समावेश आहे.

संबंधितांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३५ (पोलीस आयुक्त अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दलची शिक्षा), कलम ३७ (१) (ई) (सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी विशिष्ट कृत्यांवर निर्बंध घालण्याचा अधिकार), कलम ३७ (३) (कलम ३७ अंतर्गत जारी केलेल्या आदेशाची अंमलबजावणी व त्याचे पालन बंधनकारक असल्याची तरतूद) तसेच भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२) (शासकीय अधिकाऱ्याने विधिपूर्वक दिलेल्या आदेशाचे उल्लंघन), कलम १९० (बेकायदेशीर जमावासाठी प्रवृत्त करणे किंवा सहभागी होणे) आणि कलम २३३ (लोकसेवकाच्या कायदेशीर कर्तव्यात अडथळा निर्माण करणे किंवा विरोध करणे) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

देवगड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी रवींद्र महाले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देवगड तालुक्यात तथाकथित प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प रद्द करावा तसेच आंबा बागायतदारांना वाढीव नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी मिठमुंबरी येथील समुद्रकिनारी जलसमाधी आंदोलन आयोजित करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू असतानाही मोठ्या संख्येने जमाव एकत्र करून सरकारी आदेशाचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. त्यानुसार संबंधितांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास देवगड पोलीस करीत आहेत.

error: Content is protected !!