बीएलओ ड्युटीतून मुक्ततेसाठी उद्या प्राथमिक शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन; जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून शिक्षकांवर सोपविण्यात येणाऱ्या शैक्षणिकेतर जबाबदाऱ्यांमधून पूर्णपणे मुक्तता, २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना टी ई टी परीक्षेतून सूट तसेच पदोन्नती धोरणात अनुभव व ज्येष्ठतेला प्राधान्य द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यातील प्राथमिक शिक्षक उद्या (९ जुलै) राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठाच्या माध्यमातून शाळा बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शिक्षक सकाळी ११ वाजता प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या प्रधान कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देणार आहेत. आंदोलनामुळे जिल्ह्यातील अनेक प्राथमिक शाळांमधील अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. शिक्षक संघटनांनी मतदार यादीच्या विशेष संघन पुनरावलोकन (SIR) मोहिमेसह निवडणूक, जनगणना आणि अन्य प्रशासकीय कामांमुळे शिक्षकांचा मोठा वेळ खर्ची पडत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी आवश्यक वेळ मिळत नसल्याचा दावा संघटनांनी केला आहे. शिक्षकांचे मुख्य कार्य अध्यापन असल्याने त्यांना अशा शैक्षणिकेतर कामांतून पूर्णपणे मुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय २०१३ पूर्वी नियुक्त शिक्षकांना TET परीक्षेतून सूट द्यावी, अनेक वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असलेल्या शिक्षकांना पुन्हा पात्रता परीक्षा देण्याची सक्ती करू नये, तसेच TET परीक्षा अधिक व्यावहारिक व शिक्षकाभिमुख करावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे. राज्य सरकारच्या नव्या पदोन्नती धोरणावरही शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पदोन्नतीमध्ये अनुभव आणि ज्येष्ठतेला योग्य प्राधान्य दिले जात नसल्याने दीर्घकाळ सेवा बजावणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनांनी केला आहे. या सर्व मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले असून, सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ, सिंधुदुर्ग यांनी दिला आहे.

error: Content is protected !!