एलसीबी ची वरवडे गावात कारवाई
कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील वरवडे निरभाटले येथे मांगरात लपवून ठेवलेल्या सिंगल बॅरेल बेकायदेशीर बंदुक आणि जिवंत सात काडतुसांसह संशयित आरोपी पांडुरंग उर्फ संतोष आत्माराम घाडी ( वय 46,रा. निरभाटले, वरवडे ) याला एलसीबी सिंधुदुर्ग च्या पथकाने ताब्यात घेत कणकवली पोलिसांच्या स्वाधीन केले.एलसीबी पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय रामचंद्र शेळके यांच्या नेतृत्वाखाली , सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुरेश राठोड, हवालदार किरण देसाई, हवालदार प्रकाश कदम,हवालदार आशिष गंगावणे,महिला पोलीस हवालदार रुपाली खानोलकर यांच्या पथकाने 12 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी वरवडे निरभाटले येथे केली. याबाबत हवालदार किरण देसाई यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून संशयित संतोष घाडीगांवकर च्या अटकेची कारवाई सुरू होती. एलसीबी चे पथक कणकवली येथे पेट्रोलिंग करत असताना त्यांना संतोष घाडी हा वरवडे निरभाटले येथे अवैध बंदूक आणि काडतुसे बाळगून असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार एलसीबी च्या पथकाने वरवडे निरभाटले येथे जाऊन संतोष घाडी याच्याकडे चौकशी केली असता त्याच्याकडे सिंगल बॅरल बंदूक, बंदुकीची नळी आणि 7 जिवंत काडतुसे असा एकूण 35 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल आढळून आला. सर्व मुद्देमाल सह आरोपीला ताब्यात घेऊन कणकवली पोलीसांच्या ताब्यात दिले.












