तालुक्यात बी एस एन एल सेवा नॉट रिचेबल…

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील बी एस एन एल सेवेचा पुरता बोजावरा उडाला असून बी एस एन सेवाच नॉट रिचेबल झाली आहे. त्याचा  परिणाम संपर्क व ऑनलाईन सेवेवर होत आहे. वारंवार विस्कळीत होणाऱ्या नेटवर्कमुळे ग्राहक हैराण झाले असून कंपनीच्या गलथान कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.      वैभववाडी तालुका हा डोंगराळ व दळणवळणाच्या दृष्टीने दुर्गम तालुका आहे. तालुक्यात बी एस एन एल कंपनीने सर्वत्र मोबाईल टॉवर उभारले आहेत. मात्र गेले काही महिने या टॉवरची रेंजच गायब होत असल्यामुळे ग्राहक नॉट रिचेबल होत आहेत. खेडे गावातील ग्रामस्थ संपर्कासाठी बी एस एन एल मोबाईल टॉवर अवलंबून असतात. मात्र गेले काही महिने या टॉवर म्हणजे शोभेची बाहुली ठरली असून मोबाईल सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. मोबाईल सेवेच्या सुरुवातीला सरकारी कंपनी असलेल्या बी एस एन एल कंपनीने ग्रामीण भागात मोबाईल टॉवर उभारल्यामुळे ग्रामीण भागातील मोबाईल ग्राहकांनी बी एस एन कंपनीची सिम कार्ड घेतली आहेत. मात्र कंपनीच्या विस्कळीत सेवेमुळे अनेक ग्राहकांनी खाजगी मोबाईल कंपन्याकडे वळल्याचे पाहायला मिळत आहे.    

सरकारने एकीकडे सर्व सरकारी कामकाज ऑनलाईन केले आहे. मात्र ऑनलाईन काम करण्यासाठी नेटवर्क मिळतं नसल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. नेटवर्क नसल्यामुळे पाच मिनिटाच्या कामासाठी नागरिकांना तासंतास ताटकळत राहावे लागत आहे. तालुक्यातील बी एस एन एल कंपनीच्या कारभारात सुधारणा झाली नाही. तर ग्राहक आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत. मोबाईल टॉवरला चांगली बॅटरी नसल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास लगेचच मोबाईल नेटवर्क सेवा सुद्धा गायब होत आहे. सर्व टॉवरना चांगल्या प्रकारची बॅटरी बसविण्याची मागणी ग्राहाकांकडून करण्यात येत आहे.

error: Content is protected !!