कोल्हापूर महानगरपालिकेच्या केएमटी ताफ्यात अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बस दाखल

पन्हाळा, धार्मिक स्थळ जोतिबा आदमापूर (श्री बाळूमामा) या प्रमुख स्थळांसाठी नवीन बससेवा

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर महानगरपालिकेच्या के.एम.टी साठी हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक दिवस आहे. केंद्र शासनाच्या PM e-Bus Sewa योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अत्याधुनिक वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेसपैकी पहिल्या ई-बसेस शास्त्रीनगर येथील के.एम.टी कार्यशाळेत दाखल झाल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेला ९ मीटर लांबीच्या ५० आणि १२ मीटर लांबीच्या ५० अशा एकूण १०० वातानुकूलित इलेक्ट्रिक बसेस तसेच ब्रेकडाऊनसाठी ५ जादा बसेस मंजूर आहेत. पहिल्या टप्प्यातील बसेस शहरात दाखल झाल्या असून, उर्वरित बसेस टप्प्याटप्प्याने येणार आहेत. तांत्रिक चाचण्या पूर्ण झाल्यानंतर त्या लवकरात लवकर नियमित प्रवासी सेवेत रुजू होणार आहेत.

शहरातील विद्यमान मार्गांची पुनर्रचना करून गर्दीच्या वेळी फेऱ्या वाढवल्या जाणार आहेत. शिरोली, गोकुळ शिरगाव आणि कागल एम.आय.डी.सी परिसरासाठी विशेष मार्ग सुरू केले जातील. ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी आणि कामगारांसाठी कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल. ऐतिहासिक पन्हाळा, धार्मिक स्थळ जोतिबा आणि आदमापूर (श्री बाळूमामा) या प्रमुख स्थळांसाठी नवीन बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. ई-बसेसमुळे इंधन खर्चात बचत होईल, कार्बन उत्सर्जन कमी होईल आणि नागरिकांना प्रदूषणमुक्त व आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. यावेळी परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव, गटनेते शारंगधर वसंतराव देशमुख, समिती सदस्य संतोष लाड, वर्क्स मॅनेजर रणधीर मोरे, अमेय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!