विविध योजनांचे लाभ वितरण, नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

कणकवली (प्रतिनिधी) : राज्यभर साजऱ्या होत असलेल्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने कणकवली तालुक्यातील फोंडाघाट ग्रामपंचायत सभागृहात फोंडाघाट मंडळाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान’ राबविण्यात आले. यावेळी विविध महसूल योजनांची माहिती देण्यात आली आणि याला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभागही लाभला. फोंडाघाट ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात विविध योजनांचा लाभ देणारा कार्यक्रम यावेळी पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान फोंडाघाट सरपंच संजना आग्रे यांनी भूषवले. या कार्यक्रमात संजय गांधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तहसीलदार, कणकवली यांच्याकडून मंजूर लाभ आदेशाचे वितरण करण्यात आले. लाभार्थ्यांना सत्यापन प्रमाणपत्रे व रेशन कार्ड वाटप करण्यात आले. याशिवाय सातबारा उतारे, उत्पन्न, वय, अधिवास, जात प्रमाणपत्रांचे वितरण व वारस तपास अर्ज स्वीकृतीही करण्यात आली.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नायब तहसीलदार एम. बी. मंडले, फोंडाघाट मंडळ अधिकारी प्रविण मोंडे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला फोंडाघाट सरपंच संजना आग्रे तसेच फोंडाघाट विकास सोसायटीचे चेअरमन राजन नानचे यांनी शुभेच्छा देत महसूल विभागाच्या कामाचे कौतुक केले. यावेळी लोरे नं.१ ग्राम महसूल अधिकारी श्री. शिंदे यांनी ‘ऍग्री स्टॅक’ व ‘ई-पिक पहाणी’ याबाबत मार्गदर्शन करून मुदतीत ई-पिक पहाणी पूर्ण करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरकुळ खुर्द ग्राम महसूल अधिकारी श्रीम. श्रीया शिंदे व सूत्रसंचालन करंजे ग्राम महसूल अधिकारी श्रीम. गोडे यांनी केले.

कार्यक्रमास स्थानिक ग्रामस्थ, लाभार्थी, महसूल मंडळातील अधिकारी-कर्मचारी, पोलीस पाटील, पत्रकार श्रीनिवास नाडकर्णी, फोंडाघाट महाविद्यालयाचे प्रा. विनोद पाटील, ग्रामपंचायत अधिकारी मंगेश राणे, कृषी सहाय्यक श्रीम. परब, महा-ई-सेवा केंद्राचे गणेश तेली आदी मान्यवर उपस्थित होते.












