कसालमध्ये भीषण अपघात!

पत्नीचा मृत्यू, पती आणि मुलं थोडक्यात बचावली

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : मुंबई गोवा महामार्गावर कसाल येथील खालसा धाब्यासमोर एका मोपेडला ईर्टीका कारने जोरदार धडक दिल्यामुळे ओरोस वर्दे रोड येथील मोपेडवर मागे बसलेल्या शमिका शशांक पवार (वय २७) या जागीच ठार झाल्या. तर मोपेड चालक शशांक प्रकाश पवार (वय ४०), त्यांची चार महिन्याची मुलगी पवित्रा व साडेतीन वर्षाचा प्रभास हा सुदैवाने बचावला. हा अपघात सोमवारी दुपारी १२.३० च्या दरम्यान झाला. घटनास्थळी तात्काळ ओरोस पोलीस, महामार्ग पोलीस व कसालचे सरपंच राजन परब पोहचले. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले.

गोव्याकडून आलेली MP 09 ZY 6975 ही ईर्टीका कार मुंबईच्या दिशेने जात असताना कणकवलीच्या दिशेने जाणारे शशांक पवार यांनी महामार्गावर विरोधी दिशेकडील दुसऱ्या लेनकडे जाण्याचा आकस्मिक प्रयत्न केला. त्यामुळे या कारची धडक पवार यांच्या MH 07 AV 1229 या अपंगांच्या चार चाकी सुझुकी मोपेडला बसली. मोपेडच्या मागे असलेल्या शशांक पवार यांच्या पत्नी शमिका पवार या धडकेत रस्त्यावर जोरदार आपटल्या. त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्या जागीच गतप्राण झाल्या. तर मोपेड स्वार शशांक पवार व मयत झालेल्या शमिका पवार यांच्या हातात असलेली चार महिन्यांची पवित्रा व मध्ये बसलेला साडेतीन वर्षाचा त्यांचा मुलगा प्रभास हा सुदैवाने बचावला.

याप्रकरणी ईर्टीका गाडीचा चालक राहुल शर्मा याच्या विरोधात गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. अपघात वृत्त समजतात घटनास्थळी महामार्ग पोलिसांचे पथक तातडीने दाखल झाले. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश गवस, नंदू गोसावी, रवी इंगळे, सागर परब ओरोस पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार भुतेलो, गोसावी दाखल झाले. अपघात स्थळी नागरिकांनीही मदत कार्य केले.

error: Content is protected !!