खारेपाटण (प्रतिनिधी) : समाजातील निराधार वंचिता प्रति संवेदनशील भावना, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि तंत्रज्ञानाची ताकद यांचे उत्तम उदाहरण ठरलेली घटना म्हणजे गेल्या दीड वर्षांपासून बेपत्ता असलेली मानसिक आजारी महिला एका सिंधुदुर्ग स्थित आश्रमाच्या मदतीने आणि एका साध्या गुगल सर्चच्या जोरावर कुटुंबाशी पुन्हा एकत्र आली आहे. कर्नाटक राज्यातील महिला वेलंकिनी रॉड्रिग्स उर्फ कविश्री शारदा वेलंगेकर, उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार तालुक्यातील कोडिबाग, सर्वोदय नगर येथील रहिवासी आहे. अत्यंत सुशिक्षित असलेल्या वेलंकिनी यांनी एम.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. मात्र, मानसिक आजारामुळे त्या बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही तीव्र चिंतेची अशी बाब होती. तर त्यांची शोधमोहीम त्यांच्या कुटुंबीयांनी सुरू केली होती.
वेलंकिनी यांचा घरापर्यंतचा प्रवास ५ फेब्रुवारी २०२४ रोजी सुरू झाला,जेव्हा त्या गोव्या राज्यातील दक्षिण गोवा जिल्ह्यात वर्ना पोलिस स्टेशनच्या हद्दीतील परिसरात अत्यंत हालाखीच्या अवस्थेत सापडल्या. आणि त्यानंतर त्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील पणदूर गावातील ‘संविता आश्रम’ येथे “जीवन आनंद संस्थेच्या” माध्यमातून दाखल करण्यात आले. आश्रमात त्यांच्यावर सातत्यपूर्ण वैद्यकीय उपचार, समुपदेशन होवून त्यांना भावनिक आधार दिला गेला. काही महिन्यांनंतर त्यांच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाली आणि त्यांना हळूहळू आपल्या ओळखीचे ठिकाणे आठवू लागले – त्यात त्यांच्या गावाचे नावदेखील होते. सदर बाब ओळखून, संविता आश्रमाचे ट्रस्टी किसन चौरे यांनी गुगल सर्चचा वापर करून त्यांच्या मूळ गावाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि त्यांनी कारवार शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. आणि योगायोगाने, वेलंकिनी यांच्या कुटुंबीयांनी कारवार महिला पोलिस ठाण्यात हरविल्याचा रिपोर्ट आधीच दाखल केला होता. वेलंकिनी सापडल्याची बातमी ऐकून कुटुंबीयांना प्रचंड आनंद झाला. या घटनेची माहिती मिळताच मंगळवारी, त्यांचा भाऊ मंगेश आणि वहिनी सुरेखा, कारवार पोलिस ठाण्याचे एएसआय संजाण्णा वनहळ्ळी यांच्या समवेत आश्रमात पोहोचले आणि अधिकृतरीत्या वेलंकिनी यांना ताब्यात घेतले. व अखेर, त्यांच्या दीर्घ काळाच्या वेदनेला आणि शोधाला एक भावनिक पूर्णविराम मिळाला.
जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदिप परब यांनी सांगितले की, मानसिक आजार असलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरी व समाजात पुनर्वसन करणे अत्यंत गरजेचे आहे, आणि त्यासाठी कुटुंबाचा पाठिंबा हा दीर्घकालीन उपचार आणि सौख्यासाठी फार महत्त्वाचा असतो. या पुनर्मिलनामागे सविता आश्रमातील देवु सावंत, आशिष कांबळी, लीना पालकर, प्रतीक्षा सावंत, सुवर्णा कोकरे आणि इतर कर्मचाऱ्यांचे सहृदय योगदान आणि अहोरात्र सेवा मोलाची ठरली. तर ही हृदयस्पर्शी गोष्ट हे दाखवून देते की समाजाचा पाठिंबा, सकारात्मक हस्तक्षेप आणि इंटरनेटसारख्या साधनांचा योग्य उपयोग केल्यास आयुष्ये बदलू शकतात आणि हरवलेली नाती पुन्हा जोडता येतात.












