वैभववाडी (प्रतिनिधी) : पुत्रविराहाचे दुःख हे माता-पित्याच्या दृष्टीने खूपच मोठे असते परंतु ते दुःख देत असताना देवाने आमच्यावर उपकार केले आहेत फक्त दुःख दिले नाही तर तर त्या दुःखाला अभिमानाची झालर आहे. त्याने देशासाठी दिलेले सर्वोच्च बलिदान प्रेरणादायी व आदर्शवत आहे. असे भावपुर्ण उद्धगार हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या विरमाता ज्योती प्रकाश रावराणे काढले. अर्जुनराव राणे विद्यालय व जयेंद्र रावराणे सेमी इंग्लिश स्कूल आणि कै. हेमंत केशव रावराणे कनिष्ठ महाविद्यालय वैभववाडी यांच्यावतीने वैभववाडी तालुक्यातील सडुरे गावचे सुपुत्र शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांच्या सातव्या स्मृतीदिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यासाठी आयोजित केलेल्या वैभववाडी संभाजी चौक येथील कार्यक्रमात हे भावपूर्ण उद्गार काढले. कौस्तुभच्या बलिदान आदर्शवत व प्रेरणादायी ठरावे यासाठी आपण सर्वजण करत असलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांनी संपूर्ण तालुक्याचे आभार मानले.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या, कौस्तुभ केवळ आता आमचा राहिला नसून तो संपूर्ण देशाचा झाला आहे. आजच्या तरुणांना उद्देशून त्या म्हणाल्या तुम्ही जे कुठले क्षेत्र निवडाल त्यात जीव ओतून काम करा. सदैव राष्ट्र प्रथम हा विचार आपल्या मनात असला पाहिजे. विचारांशी एकनिष्ठ राहून स्वतःला ओळखून स्वतःचा अस्तित्व निर्माण करा. निर्णय क्षमता, तात्विक दृष्टिकोन हे पाठ्यपुस्तकातून मिळत नाही ते आपल्याला अनुभवातून मिळवावे लागतात. यासाठी शिक्षक, पालक, नागरिकांनी तरुणांना घडवीत असताना महत्त्वाची भूमिका पार पाडली पाहिजे असेही यावेळी त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयाच्यावतीने अराविद्यालय ते दत्त मंदिर अशी भव्य आदरांजली रॅली काढण्यात आली. भारत माता की जय! वंदे मातरम! अमर रहे,अमर रहे, हुतात्मा मेजर कौस्तुभ रावराणे अमर रहे! अशा घोषनांनी परिसर दाणानून सोडला. येथील संभाजी चौकात शहीद मेजर कौस्तुभ रावराणे यांना त्यांच्या माता ज्योती रावराणे, तसेच कार्याध्यक्ष जयेंद्र रावराणे यांनी यांनी पुष्प चक्र अर्पण केले. यावेळी संचालक शरद नारकर, विजय रावराणे, मधुकर जाधव, मुख्याध्यापक बीएस नाटकर संदेश तुळसणकर, संगीता पाटील मंदार चोरगे विविध संस्थांचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












