भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये मंजूर असलेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ आज भाजपचे प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत गावराई सरपंच सोनल शिरोडकर यांच्या हस्ते झाला

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या वतीने गावराई गावामध्ये विविध विकासकामे मंजूर असून या विकास कामांचा शुभारंभ करण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांचा दौरा आयोजित केला होता. यावेळी ओरोस मंडळ अध्यक्ष दादा साईल, प्रभाकर सावंत, सुप्रिया वालावलकर, अंकुश जाधव, गावराई सरपंच सोनल शिरोडकर, माजी सरपंच उदय नारळीकर, बूथ कमिटी अध्यक्ष् आशुतोष सावंत , यांच्यासह भाजपचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.कुडाळ तालुक्यातील गावराई गावच्या दौऱ्यावर आलेल्या भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांनी प्रथम गावराई गावचे ग्रामदैवत श्री गिरोबा देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर गावराई गावामध्ये मंजूर असलेल्या विविध रस्ते व जलजीवन योजनेच्या विकास कामांचा शुभारंभ करण्यापूर्वी ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बोलताना निलेश राणे म्हणाले भाजप पक्षाच्या वतीने तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सहकार्यातून या गावांमध्ये विविध विकास कामे हाती घेतली आहेत. यापुढेही उर्वरित विकास कामे मंजूर करून घेतली जातील. त्यासाठी आपले सहकार्य मोलाचे आहे. गावच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र या आपल्या गावासाठी विकास निधी कुठेही कमी पडू देणार नाही. तुम्ही म्हणाल ती विकास कामे मंजूर करून देण्याची जबाबदारी मी स्वीकारतो. त्यासाठी तुमची सर्वांची साथ महत्त्वाची आहे असे सांगितले. आमची सत्ता नव्हती तेव्हा आम्ही कोणत्याही कामाचे भूमिपूजन केले नाही. तेथे नारळ घेऊन गेलो नाही. मात्र सध्याचे आमदार आम्ही मंजूर केलेल्या कामांचे भूमिपूजन करायला नारळ घेऊन फिरत आहेत. असा टोला यावेळी निलेश राणे यांनी लगावला.गावराई गावात मंजूर असलेल्या भोगलेवाडी रस्त्याचे तसेच देऊळवाडी येथील जलजीवन नळ पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन आज माजी खासदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच सोनल शिरोडकर यांच्या हस्ते सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!